धिंड काढल्याने आजीने मुलांना कोंडले

By admin | Published: May 23, 2017 01:50 AM2017-05-23T01:50:30+5:302017-05-23T01:50:30+5:30

चकली चोरून खाल्ल्याच्या आरोपावरून विवस्त्र धिंड काढल्याने घाबरलेली मुले जेव्हा पळतपळत घरी आली, तेव्हा ती खूप घाबरलेली होती.

The grandmother stole a child from Dhindale | धिंड काढल्याने आजीने मुलांना कोंडले

धिंड काढल्याने आजीने मुलांना कोंडले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
उल्हासनगर : चकली चोरून खाल्ल्याच्या आरोपावरून विवस्त्र धिंड काढल्याने घाबरलेली मुले जेव्हा पळतपळत घरी आली, तेव्हा ती खूप घाबरलेली होती. त्यांची अवस्था पाहून त्यांच्या आज्जीही घाबरल्या आणि पुन्हा कोणी मारायला येईल या भीतीपोटी त्यांनी त्याच अवस्थेत मुलांना कोंडून ठेवल्याची माहिती पुढे आली. या दोन्ही मुलांच्या डोक्यावरील वडिलांचे छत्र हरपले आहे आणि त्यांच्या आया धुण्या-भांड्याचे काम करून कुटुंबाचे पोट भरतात. त्या जेव्हा घरी आल्या, तेव्हा त्यांनी या मुलांची सुटका केली...
मारहाण करून विवस्त्र धिंड काढल्याने मुले भेदरलेली होती. त्यातच त्यांचे केस अर्धवट अवस्थेत कापलेले होते. त्यामुळे तशा अवस्थेतच ती पळतपळत आपापल्या घरी आली. दोन्ही मुलांची आजी घरी असते. त्यांना मुलांची ही अवस्था पाहून धक्काच बसला. रडतरडत जेव्हा मुलांनी घडला प्रकार सांगितला, तेव्हा त्याही घाबरल्या. मुलांना मारण्यासाठी पुन्हा कोणीतरी येईल, या भीतीने त्यांनी आपापल्या घरात या मुलांना कोंडून ठेवले. त्यांनी घडल्या प्रकाराबद्दल दुकानदाराची माफीही मागितली.
दोन्ही मुलांना वडील नाहीत. त्यांच्या आयाच धुणी-भांडी करून त्यांचा सांभाळ करतात. या कामासाठी त्या मुंबईला जातात. तेथून जेव्हा त्या घरी परतल्या, तेव्हा त्यांनाही हा प्रकार समजल्याने धक्का बसला. त्यांनीच कोंडलेल्या घरातून मुलांची सुटका केली. त्यांचे अर्धवट कापलेले केस आणि भेदरलेली अवस्था पाहून त्यांचेही डोळे भरून आले. आधी त्यांनी दुकानात नेऊन मुलांचे सर्व केस काढून टाकले. तोवर परिसरात मोठी गर्दी झाली. मुलांची, त्यांची आज्जी आणि आईची अवस्था पाहून लोकांच्या संतापाचा कडेलोट झाला. गळ्यात चपलांचा हार घालून धिंड काढल्याचा व्हिडीओही तोवर व्हायरल झाला होता. तो पाहून काही जण गोळा झाले.
ही मुले नागसेन मराठी शाळेत शिकतात. सध्या शाळेला सुटी आहे. त्यामुळे ती मित्रांसोबत खेळत होती आणि तेव्हाच त्यांच्यावर चोरीचा आळ आला. जेव्हा मुलांचे केस अर्धवट कापून, गळ््यात चपलांचा हार घालत त्यांची धिंड काढण्याचा प्रयत्न दुकानदाराने- त्यांच्या मुलांनी सुरू केला, तेव्हा त्याला काही जणांनी हटकले. त्यावर ‘दोनो बच्चोंने दुकान में चोरी की है. आप बीच में मत आयो,’ असा दम त्यांना भरला. साधारण दीड तास सगळा प्रकार सुरू होता. त्यामुळे अनेक जण इच्छा असूनही मध्ये पडले नाहीत. शिवाय दुकानदाराच्या मुलांविरूद्ध आधीच मारहाणीचे गुन्हे असल्याने काही जण घाबरले. रात्रीपर्यंत फेसबुक, यू ट्यूबवर व्हिडीओ फिरत होता. तो पाहिल्यावर संतापलेल्या नागरिकांनी कुटुंबासह हिललाईन पोलीस ठाणे गाठले आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन वाघमारे यांना सर्व प्रकार सांगितला. व्हिडीओ क्लिप दाखवली. घटनेचे गांभीर्य पाहून त्यांनी मारहाण, अ‍ॅट्रोसिटी अ‍ॅक्ट आणि पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल केला आणि रात्रीच तिघांनाही अटक केली. घटनेला दोन दिवस उलटूनही परिसरातील तणाव निवळलेला नाही. त्यामुले पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Web Title: The grandmother stole a child from Dhindale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.