दादा, आम्हाला माफ करा !
By admin | Published: April 9, 2017 12:11 AM2017-04-09T00:11:37+5:302017-04-09T00:11:37+5:30
जागर
दादा, आपल्या जन्मशताब्दी वर्षात वसंतदादा साखर कारखान्याचे चक्र कसे फिरवायचे हा सर्वांना प्रश्न पडला आहे. आपण गेल्यानंतर हा कारखाना आम्ही असा चालविला की, तो दिवसेंदिवस तोट्यातच गेला. आजची त्याची अवस्था पाहिली तर वाटते दादा, माफ करा. आम्हाला हा वारसा जपता आला नाही. ती सूतगिरणी, ती बँक, तो बझार, सर्व कोठे आहे, याचे उत्तरही आम्हाला देता येत नाही.
दादा, आपला जन्म कोल्हापूर मुक्कामी १३ नोव्हेंबर १९१७ रोजी झाला. आणखीन सात महिन्याने आपली जन्मशताब्दी साजरी करण्यात येईल. आपणास बहात्तर वर्षांचे आयुष्य लाभले. तुमचं सारं आयुष्य धकाधकीत गेले. सत्ता मिळाली पण त्यावर बसूनही तुम्ही संघर्षच केला. सहकार, ग्रामीण विकास, औद्योगिकरण असे विकासाचे मार्ग कधी सोडले नाहीत. महाराष्ट्र राज्य सरकारने औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना करून (एमआयडीसी) औद्योगिक विकास करण्यापूर्वी तुम्ही सहकारी औद्योगिक वसाहती स्थापन केल्या. त्याच धर्तीवर नंतर राज्य औद्योगिक विकास महामंडळ स्थापन झाले. शेतकऱ्याच्या मालाला वाजवी भाव मिळायचा असेल तर त्यावर प्रक्रिया होणे आवश्यक आहे म्हणून तुम्ही सहकाराच्या माध्यमातून साखर कारखानदारी, कापसासाठी सूतगिरण्या, भुईमुगासाठी तेलगिरण्या उभारण्याचा सपाटा लावला.
सांगली ते माधवनगर रस्त्यावरील विस्तीर्ण माळावर शेतकऱ्यांच्या नावाने सहकारी साखर कारखाना सुरू केला. त्याची नोंदणी ८ आॅक्टोबर १९५६ रोजी केली. म्हणजेच आता या कारखान्याचे हीरकमहोत्सवी वर्ष चालू असून, तो एकसष्टीत पदार्पण करीत आहे. तुमच्या कारखान्याचा विस्तार वाढत वाढत गेला. तो आशिया खंडातला सर्वांत मोठा कारखाना म्हणून महाराष्ट्राच्या साखर कारखानदारीचा मार्गदर्शक ठरला. कारण याच कारखान्याच्या बॉयलर (मिल) पासून केवळ पाचशे-दोनशे मीटर अंतरावरील गेस्ट हाऊसमध्ये तुम्ही राहून तो चालविला. मात्र, स्वत: कधी अध्यक्षपदावर बसून मिरविला नाहीत. कारखान्याच्या पट्ट्यापासून काही अंतरावरच तुम्ही राहात होता. त्याच्या स्थापनेपासून अखेरचा श्वास घेईपर्यंत तुम्हाला एक मोठा बंगला बांधावा, असा मोह झाला नाही. त्याच छोटेखानी गेस्ट हाऊसवर राहून महाराष्ट्राच्या राजकारणाला वारंवार आव्हान देत राहिला. तुम्ही या वैभवशाली कारखान्यावर मुक्कामाला अन पाहात होता तेव्हा कृष्णा काठावरील शेतकऱ्याला नदीतले पाणी उचलून शेती बारमाही करायची याचीही कल्पना नव्हती. सुपीक जमिनीवर ज्वारी, भात, हरभरा, गहू, मका पिकत होता. पोटाला धान्य आणि जनावरांना चारा झाला की झालं. आणखी कायसताना भेटण्यासाठी जनसागरच लोटत असे. येणारा प्रत्येक माणूस किमान चहापान करूनच जात असे. दादा, भेटले, याचंच त्याच्या चेहऱ्यावर समाधान असायचं. दादांना काम सांगितलं, त्यांनी ऐकून घेतलं. ते होणार यावरच लोकांचा प्रगाढ विश्वास! झालं नाही तरी खंत नाही, पण दादा भेटले, काम ऐकले, संबंधिताला सूचना केली.
तुम्ही साखर कारखाना उभा करण्याचे स्वप् लागतं? अशीच मनोधारणा होती. साखर तयार करण्यासाठी उसाची लागवड वाढणे आवश्यक म्हणून तुम्ही शेतकऱ्यांना संघटित केलं. त्याला उसाची लागवड करायला शिकविलं. त्यासाठी पाणी, बियाणं, खत, आदींची व्यवस्था केली. उसाच्या वाहतुकीसाठी पाणंदीचे रस्ते केले. कारखान्याची मशिनरी चालवायला माणसं कुठं होती? साधा पॅनमन मिळत नव्हता. तुम्ही बिहार राज्यातील दरभंगा परिसरात गेलात. तेथील साखर कारखानदारी पुढे होती. वीस कुटुंबांना सांगलीला आणलंत. त्यांची राहण्यापासून खाण्यापर्यंतची व्यवस्था केलीत. तुमचं लक्ष इतकं होतं की, त्यांनी सांगली कायमची सोडली नाही. त्यांनी पॅनमन म्हणून कारखाना चालविला. किती धडपड तुमची?
उसाची लागवड करण्याची व्यवस्था करण्यापासून साखरेचे उत्पादन करण्यापर्यंतची व्यवस्था तुम्ही घालून दिली. कऱ्हाडचा कृष्णा, इचलकरंजीचा पंचगंगा, परित्याचा भोगावती, कोडोलीचा वारणा, संकेश्वरचा हिरण्यकेशी अशी कारखान्यांची माळच तुमच्या कारखान्याबरोबर तयार झाली. सर्वांची नावंसुद्धा किती सुंदर होती. त्या-त्या परिसरातील वाहणाऱ्या जीवनदायिनी नद्यांची नावे तुम्ही लोकांनी कारखान्यांना दिली होती. कृष्णा काठावरील सांगलीच्या कारखान्याला तुम्ही शेतकरी नाव दिलं.
हा प्रयोग यशस्वी झाल्यावर सूतगिरणी उभारली. तुम्ही सत्तेपासून दूर राहिला. अनेक वर्षे आमदारही नव्हता. राज्य साखर संघ, कॉँग्रेस पक्षाची संघटना, आदींवर काम करीत राहिला. आपण उभारलेल्या कारखान्याच्या प्रवर्तक मंडळीच्यानंतर आलेल्या पहिल्या संचालक मंडळात तुम्ही होता, पण अध्यक्ष कधीच झाला नाही. अंकलखोपचे दिनकरबापू पाटील हेच तसे पहिले अध्यक्ष होते.
आपण स्थापन केलेल्या साखर कारखानदारीतून महाराष्ट्रातील अनेकांनी प्रेरणा घेतली, तुमचे मार्गदर्शन आणि मदत घेतली. त्यातून भलीमोेठी चळवळ उभी राहिली. आपण काळानुरूप बदलत राहिलात. साखर उद्योगासमोरील आव्हाने स्वीकारत राहिलात. त्यासाठी संशोधन संस्था स्थापन करण्याचाही निर्णय घेतलात. केवळ चौथीपर्यंतचे शिक्षण घेतलेले तुम्ही! पण तुम्हाला संशोधनाची गरज पटली. कारण तुम्ही याच काळात जगभरातील साखर उद्योगाचा अभ्यास करीत होता. पुस्तकांच्या पानातून नव्हे, पण अभ्यासपूर्ण निरीक्षणातून तुम्ही तज्ज्ञ झाला होता. महाराष्ट्राचे आज भूषण ठरलेली डेक्कन शुगर इन्स्टिट्यूट ही संस्था उभी केली. आज जगातील प्रमुख ऊस संशोधन संस्थेत तिचा समावेश आहे. आपल्या निधनानंतर शरद पवार यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर या संस्थेला आपलेच नाव दिले. आता ही संस्था ‘वसंतदादा
शुगर इन्स्टिट्यूट’ म्हणून उभी आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरातील शेतकरी तसेच साखर
उद्योगास ही संस्था मार्गदर्शक ठरली आहे. केवढी तुमची दूरदृष्टी!
सांगलीच्या साखर कारखान्याचा विस्तारही तुम्ही नेहमी करीत राहिला. सहा तालुक्यांतील १५८ गावांतील सुमारे त्रेचाळीस हजार शेतकरी सभासद झाले. ज्याला सभासद व्हायचे त्याने व्हावे, अशीच आपली धारणा होती. त्यामुळे हा कारखाना देशातील नव्हे, तर आशिया खंडातील सर्वांत मोठा ठरला. उत्पादन क्षमता वाढवितानाच विविध उपपदार्थ निर्मितीचे प्रकल्पही आपण उभे केले. अल्कोहोल ते अॅसेटीक प्रकल्पांचा त्यामध्ये समावेश होता. उसाचे क्षेत्र वाढविण्यासाठी पाणी योजनाही राबविल्या. उसाचे उत्तम बियाणं शेतकऱ्यांना मिळावं म्हणून बियाणाची शेतीही उभी केली.
हा सर्व आपल्या कर्तृत्वाचा आलेख मांडण्याचे कारण की, आपल्या जन्मशताब्दी वर्षात या कारखान्याचे चक्र कसे फिरवायचे हा सर्वांना प्रश्न पडला आहे. आपण गेल्यानंतर हा कारखाना आम्ही असा चालविला की, तो दिवसेंदिवस तोट्यातच गेला. गैरव्यवस्थापनाने त्यात भरच पडत गेली. आपल्या रक्ताच्या आणि विचारांच्या वारसदारांनी राजकारण करीत कारखाना अडचणीत आणत राहिले. याच काळात सांगलीसह अनेक जिल्ह्यांत नवनवे कारखाने उभे राहत होते. त्यांनी ते उत्तम चालविले, तर काही कारखाने आपल्या वारसदारांसारखेच वागल्याने बंद पडले किंवा अडचणीत आले. त्यातील काही विकले, काही चालविण्यास दिले. पण, उत्तम चालवीत आलेले साखर कारखाने बंद पडण्याचे कारणच नाही. तुमचे एकेकाळचे सहकारी नागनाथआण्णा पाटील, जी. डी. बापू लाड यांनी फारच उशिरा साखर कारखाने काढले आणि उत्तम चालविले. जसे तुम्ही चालवीत होता तसेच चालविले. कारण साखर कारखानदारीला सरकारचे नेहमीच संरक्षण होते. साखर कारखाने तोट्यात जाऊच नयेत, अशी व्यवस्था तुम्ही मंडळींनीच तयार करून ठेवली होती. ज्यांनी ते मोडूनच टाकायचे किंवा खाऊन टाकायचे ठरविले तेथे काहीही करता येत नाही, अशी अनेक उदाहरणे आहेत.
बरे हा तुमचा कारखाना चालविण्यासाठी शेतकऱ्यांनी वारंवार तुमच्या वारसदारांनाच पाठबळ दिले. तुमच्या निधनानंतर केवळ एका महिन्यातच निवडणूक लागली. तेव्हा अध्यक्षपदावर दहा वर्षे राहिलेले विष्णूअण्णा पाटील बाजूला झाले. कारण आपले चिरंजीव प्रकाशबापू पाटील यांना कारखान्याची सत्ता हवी होती. त्यावेळी हिंदकेसरी मारुती माने, दिनकर आबा पाटील, मोहनराव शिंदे आणि संभाजी पवार यांनी एकत्र येऊन आव्हान दिले. अटीतटीची निवडणूक झाली; पण बहुसंख्येने शेतकरी तुमच्या वारसदारांच्या मागेच उभे राहिले. ती आजवर परंपरा जपली आहे. याचाच अर्थ तुम्ही शेतकऱ्यांवर केलेल्या उपकाराची जाणीव त्यांनी ठेवली आणि सतत पाठबळ देत राहिले. राजकारणातही असेच पाठबळ दिले. तुमच्या जाण्यानंतरही सांगलीतून लोकसभेवर
नऊवेळा पाठविले. तुम्ही शेतकऱ्यांसाठी आयुष्य वेचले, त्याची परतफेड (तोटा सहन करूनही) शेतकऱ्यांनी कारखाना अडचणीत येऊ नये, तो तुमच्या वारसदारांकडेच राहावा, तो जपला जावा, अशी भावना व्यक्त राहिली. मला वाटते त्यांचे काही चुकले नाही.
आता हा कारखाना दोनशेहून अधिक कोटी रुपयांच्या तोट्यात (गैरव्यवहारात) अडकला आहे. जिल्हा बँकेने तो ताब्यात घेतला आहे. आपण गेलात त्याला अठ्ठावीस वर्षे झाली. एक-दोन, चार वर्षे चुका करूनही या वारसदारांनी नीट व्यवहार करण्यासाठी प्रयत्न केला नाही. तो अखेर अडचणीत आला. तुम्ही शेतकऱ्यांना जपलात, त्यांची ऐंशी कोटी रुपयांच्या ठेवी कोठे गेल्या, कामगारांची बेचाळीस कोटी रुपये देणी कशी द्यायची? जिल्हा बँकेचे ९६ कोटी रुपये कर्ज कसे फेडायचे? अशा अनेक प्रश्नांनी आम्ही चक्रावून गेलो आहोत. दादा, आपल्या जन्मशताब्दी वर्षात ही अवस्था पाहून मान शरमेने खाली जाते. तुमच्या नंतरच्या आमच्या पिढीने हा वारसा जपला नाही. इतर कोणाचा तो राहिला नसता तरी वाईट वाटले नसते, पण तुम्ही सत्तेच्या, संपत्तीच्या आहारी कधी गेला नाही. म्हणून त्या कारखान्याच्या दोन-चार खोल्यांच्या गेस्टहाऊसवर आयुष्य काढले, महाराष्ट्राच्या सत्तेवर विराजमान झालात, प्रसंगी ती फेकून दिली; पण शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद, समृद्धी आणणाऱ्या शेतकरी साखर कारखान्याला नख लागू दिले नाही. आजची त्याची अवस्था पाहिली तर वाटते दादा, माफ करा. आम्हाला हा वारसा जपता आला नाही. ती सूतगिरणी, ती बँक, तो बझार, सर्व कोठे आहे, याचे उत्तरही आम्हाला देता येत नाही.
- वसंत भोसले