रेखालेखक हरपला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2016 05:10 AM2016-12-25T05:10:51+5:302016-12-25T05:10:51+5:30
व्यंगचित्राला साहित्यात महत्त्वाचे स्थान मिळवून देणारे ज्येष्ठ व्यंगचित्रकार वसंत सरवटे यांचे शनिवारी सायंकाळी विलेपार्ले येथील राहत्या घरी निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते.
मुंबई : व्यंगचित्राला साहित्यात महत्त्वाचे स्थान मिळवून देणारे ज्येष्ठ व्यंगचित्रकार वसंत सरवटे यांचे शनिवारी सायंकाळी विलेपार्ले येथील राहत्या घरी निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा आणि नातू असा परिवार आहे.
सरवटे यांचा जन्म १९२७ साली कोल्हापूर येथे झाला. पुण्याच्या इंजिनीअरिंग महाविद्यालयातून पदवी घेतल्यानंतर सिमेंट कंपनीत त्यांनी अनेक वर्षे इंजिनीअर म्हणून काम केले. परंतु व्यंगचित्राकडे त्यांचा अधिक कल होता. पु. ल. देशपांडे, श्री. दा. पानवलकर, विजय तेंडुलकर, जयवंत दळवी आणि रमेश मंंत्री यांच्या मराठी पुस्तकांवरील मुखपृष्ठे सरवटे यांनी रेखाटली होती. गेल्या ४० वर्षांपासून ललित मासिकात व्यंगचित्रे काढण्याचे काम त्यांनी केले.
ज्येष्ठ विनोदी लेखक जयवंत दळवी यांच्या ‘ठणठणपाळ’ या मराठीतल्या खुशखुशीत साहित्यकृतीला व्यंगचित्राची जोड देण्याचे काम सरवटे यांनी केले. ‘खडा मारायचा झाला तर!’, ‘सावधान पुढे वळण आहे’,‘खेळ रेषावतारी’, ‘खेळ चालू राहिला पाहिजे!’ या व्यंगचित्रसंग्रहातून त्यांनी काढलेली व्यंगचित्रे अधिक गाजली.
सरवटे यांच्या तीन संग्रहांना राज्य शासनातर्फे गौरविण्यात आले आहे. त्यांना इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ कार्टुनिस्ट जीवनगौरव पुरस्कार, सह्याद्रीचा ‘कलारत्न’ पुरस्कार आणि कार्टुनिस्ट कंबाइन संस्थेच्या जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
अभियांत्रिकी व्यंगचित्रकार हरपला
केवळ व्यंगचित्रकार नव्हे तर व्यंगचित्रकलेचे अभ्यासक असणारी व्यक्ती म्हणजे वसंत सरवटे असे म्हणता येईल. व्यंगचित्रात तुटक रेषेने स्वत:ची एक वेगळी शैली निर्माण करत व्यंगचित्रकारांमध्ये अढळ स्थान सरवटे यांनी निर्माण केले होते. त्यांच्या व्यंगचित्रातून अभियांत्रिकी बुद्धिमत्ता दिसून येत होती. साहित्य वर्तुळात वावरणारा व्यंगचित्रकार अशी त्यांची ख्याती होती. खऱ्या अर्थाने व्यंगचित्रकार म्हणून जगलेल्या अभियांत्रिकी व्यंगचित्रकाराला श्रद्धांजली.
- विवेक मेहेत्रे,
ज्येष्ठ व्यंगचित्रकार
मुखपृष्ठे लोकप्रिय केली
सरवटे यांच्या प्रयत्नामुळे व्यंगचित्राला पुरस्कार प्राप्त झाले. माझ्या अनेक पुस्तकांची मुखपृष्ठे त्यांनी रेखाटली आहेत. अर्थचक्र हा प्रकार त्यांनी लोकप्रिय केला. त्यांच्या निधनामुळे या क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.
- राजेंद्र मंत्री, प्रकाशक
योगदानामुळे व्यंगचित्रांना चांगले दिवस
व्यंगचित्र हे केवळ पानपूरक म्हणून वापरले जात होते. परंतु सरवटे यांनी व्यंगचित्राला साहित्यात महत्त्वाचे स्थान मिळवून देण्याचे काम केले. त्यांच्या या योगदानामुळे व्यंगचित्राला चांगले दिवस आले.- विकास सबनीस, व्यंगचित्रकार
मदतनीस हरपला
निर्जीव वस्तूतून व्यंगचित्र निर्माण करण्याचे काम सरवटे यांनी केले. व्यंगचित्रांचा त्यांचा अभ्यास उत्तम होता. त्यातून होणारी विनोद निर्मिती ही अत्यंत मार्मिक होती. व्यंगचित्रासोबतच माणूस म्हणून सरवटे यांनी नेहमीच साऱ्यांना मदत केली. त्यांच्या जाण्याने एक मदतनीस हरपला आहे, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ व्यंगचित्रकार प्रभाकर वाईरकर यांनी व्यक्त केली.