कवठेत कडकडीत बंद
By admin | Published: June 5, 2017 01:05 AM2017-06-05T01:05:28+5:302017-06-05T01:05:28+5:30
शेतकरी संपाच्या चौथ्या दिवशीही कवठे येथे कडकडीत बंद पाळण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
कवठे येमाई : शेतकरी संपाच्या चौथ्या दिवशीही कवठे येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. संप मिटल्याचे जाहीर केल्यानंतर शेतकरी संभ्रमात होता. रविवारी सकाळी पुन्हा कवठे गावातून जाणाऱ्या शिरूर मंचर मार्गावर शेतकरीवर्ग मोठ्या प्रमाणात
जमा झाला. त्यात युवकांचा मोठा सहभाग होता. ज्या काही शेतकऱ्यांनी दूध आणले होते त्या शेतकऱ्यांनी पुन्हा दूध रस्त्यावर ओतून दिले. रस्त्याने जाणारी वाहने थांबवून त्याची तपासणी करण्यात आली. दुधाचा टँकर अडवून पाच हजार लिटरपेक्षा जास्त दूध रस्त्यावर सोडून दिले.
भाज्यांचे शहराकडे जाणारे ट्रक अडविले
ओतूर : नगर-कल्याण महामार्गावरील ओतूर बनकर फाटा डिंगोरे, पूर्वेकडे पिंपरी पेंढार आळेफाटा येथेही आंदोलन सुरूच आहे. शहराकडे जाणारे भाजीपाल्याचे ट्रक टेम्पो अडविले जात आहेत. कोणत्याही शेतमालाची नासाडी न करता जेथून माल घेऊन आले तेथे परत माघारी पाठवले.आज सकाळी ओतूर येथील मोनिका चौकात कलिंगडाचे टेम्पो अडविले व ते रस्त्याच्या कडेला थांबून ठेवले. डिंगोरे (ता. जुन्नर) येथेही सकाळी शेतकरी-संपकरी आंदोलकांनी भाजीपाल्याचे ट्रक अडविले. त्यांना शहरात भाजीपाला नेऊ नका, तो जेथून आणला तेथे परत घेऊन जा असे सांगून त्यांना थांबवत. यातील काही ट्रकचालकांनी ऐकले नाही, त्यामुळे नाईलाजास्तव भाजीपाला, कांदा रस्त्यावर ओतण्यास भाग पडले.काढलेला भाजीपाला एसटी गाड्यांमधील प्रवाशांना वाटून देत आहेत. दि. ५ जून रोजी महाराष्ट्र बंदचे आवाहन शेतकऱ्यांनी केले आहे.
नसरापूरला निषेध रॅली
नसरापूर : नसरापूर बाजारपेठेतून बळीराजा शेतकरी संघ व नसरापूर व पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी निषेध रॅली काढून शेतकरी आंदोलनास पाठिंबा दिला. या वेळी बळीराजा शेतकरी संघाचे महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख शामसुंदर जायगुडे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष उदय शिळीमकर, पुणे जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा फडतरे, भोर तालुकाध्यक्ष प्रमोद मोहिते, तालुका उपाध्यक्ष गणेश शिळीमकर, संघटक भरत कोंडे, हनुमंत कदम, भरत शेटे, तुकाराम झोरे, संभाजी कोंडे, सुधीर शेडगे, धनंजय शिंदे आदी शेतकरी मोठ्या संख्येने या निषेध रॅलीला उपस्थित होते. मुख्य चौकात शासनाचा निषेध करीत टोमॅटो आदी भाजीपाला रस्त्यावर ओतला होता.