वारसदाराची कृतज्ञता : सत्तेच्या गोंधळातही यशवंतराव चव्हाण पुण्यतिथीनिमित्त पवार कराडमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2019 10:39 AM2019-11-25T10:39:19+5:302019-11-25T10:39:39+5:30
राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असताना शरद पवार आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त कराडमध्ये दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे शरद पवार सकाळीच कराडमध्ये हजर झाले असून त्यांनी यावेळी यशवंतराव चव्हाणांना आदरांजली वाहिली.
मुंबई - पुतण्याचे बंड, आमदार फुटीचे संकट आणि शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस पक्षांना एकसंध ठेवणे असा तिहेरी पेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्यासमोर निर्माण झाला आहे. मात्र राजकारणातील चाणक्य म्हणून ओळख असलेले पवार निवांत असून ते कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त कराडमध्ये दाखल झाले आहेत.
राज्यातील आमदार फोडीसाठी भाजपकडून मोठे प्रयत्न करण्यात येत आहे. पुतणे अजित पवार भाजपसोबत जाऊन उपमुख्यमंत्री झाले आहे. त्यांच्या सोबत गेलेले आमदार परत आणण्यात राष्ट्रवादीला यश आले आहे. अशा स्थितीत जे आमदार आहेत, त्यांना टिकविण्याचे आव्हाण राष्ट्रवादीसमोर आहे. याकामी शिवसेना आणि काँग्रेस देखील कामाला लागली आहे. मात्र महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्याची सर्वस्वी जबाबदारी शरद पवार यांच्यावर आहे. किंबहुना त्यांच्याशिवाय महाविकास आघाडीचे पानही हालत नाही.
दरम्यान राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असताना शरद पवार आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त कराडमध्ये दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे शरद पवार सकाळीच कराडमध्ये हजर झाले असून त्यांनी यावेळी यशवंतराव चव्हाणांना आदरांजली वाहिली.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद असो वा देशातील महत्त्वाची केंद्रीय मंत्रीपदे, चव्हाण साहेबांच्या कामगिरीतून त्यांचे जीवन व त्यांचे असामान्य कर्तुत्व ठसठशीतपणे अधोरेखीत झाले आहे. सामाजिक दृष्टिकोन, सुसंस्कृतपणा, संवेदनशीलता व साधेपणा या अंगभूत गुणांमुळे साहेबांच्या प्रतिमेला लाभलेली झळाळी आजही कायम आहे. आपल्या कर्तृत्वाने महाराष्ट्राला दिशादर्शक ठरलेल्या स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या उत्तुंग व्यक्तित्वाला त्यांच्या स्मृतीदिनी विनम्र अभिवादन, अशी पोस्टही पवारांनी शेअर केली आहे.