सेवानिवृत्तीच्या दिवशीच कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युईटी
By Admin | Published: January 2, 2016 08:34 AM2016-01-02T08:34:49+5:302016-01-02T08:34:49+5:30
सामाजिक बांधिलकीचा वसा जोपासणाऱ्या महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाने (म्हाडा) सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांकरिता नवीन उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. सेवानिवृत्तीच्या
मुंबई : सामाजिक बांधिलकीचा वसा जोपासणाऱ्या महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाने (म्हाडा) सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांकरिता नवीन उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. सेवानिवृत्तीच्या दिवशीच निरोप समारंभ आयोजित करून त्यांना ग्रॅच्युईटी व रजा रोखीकरणाचे धनादेश देण्यास प्रारंभ केला आहे.
शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युईटी आणि इतर लाभ घेण्यासाठी कित्येक महिन्यांची प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागतो. म्हाडाच्या सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना यापुढे निवृत्तीच्या दिवशीच ग्रॅच्युईटी आणि इतर लाभ देण्याचा निर्णय प्राधिकरणाने घेतला आहे. त्यानुसार गतवर्षी अर्थात ३१ डिसेंबर रोजी सेवानिवृत्त झालेल्या म्हाडातील ८ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तातडीने लाभ देऊन त्यांना दिलासा दिला आहे.
म्हाडाच्या सेवेतून गुरुवारी ८ अधिकारी आणि कर्मचारी सेवानिवृत्त झाले. त्यांचा सत्कार सभारंभ म्हाडा कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. या वेळी कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युईटी आणि रजा रोखीकरणाचे धनादेश आणि सेवा प्रमाणपत्र सुपुर्द करण्यात आले. म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एस. झेंडे यांच्या संकल्पनेतून ही योजना साकारली आहे.
म्हाडाचे सचिव डॉ. बी.एन. बास्टेवाड, वित्त नियंत्रक संजय शहा यांच्या हस्ते कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)