गुरुत्वाकर्षण न्यूटनने नाही तर भारतीयांनी शोधले : मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2019 12:59 PM2019-08-18T12:59:14+5:302019-08-18T13:05:30+5:30
गुरुत्वाकर्षणाचा शोध न्यूटनने लावल्याचे संपूर्ण जगाने मान्य केले आहे. मात्र न्यूटनच्या आधी हजारो वर्षांपूर्वी हिंदू धर्माच्या ग्रंथांमध्ये गुरुत्वाकर्षणाचा उल्लेख करण्यात आला आहे, असा दावा केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल यांनी केला आहे.
पुणे : गुरुत्वाकर्षणाचा शोध न्यूटनने लावल्याचे संपूर्ण जगाने मान्य केले आहे. मात्र न्यूटनच्या आधी हजारो वर्षांपूर्वी लिहिलेय हिंदू धर्माच्या ग्रंथांमध्ये गुरुत्वाकर्षणाचा उल्लेख करण्यात आला आहे असा दावा केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल यांनी केला आहे. इतकेच नव्हे तर संपूर्ण फिजिक्सचा पाया असणाऱ्या ऍटम आणि मॉलिक्यूल ही संज्ञाही ऋषी प्रणव यांची असल्याचेही त्यांनी म्हटले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे आयोजित कार्यक्रमात ते दिल्लीत बोलत होते. या कार्यक्रमाला सरसंघचालक मोहन भागवत आणि योगगुरू बाबा रामदेवही हजर होते.
यावेळी पोखरीयाल म्हणाले की, ' संस्कृत ही जगातील एकमेव वैज्ञानिक भाषा असल्याचे आपल्याला सिद्ध करायचे आहे. त्याकरिता त्यांनी आयआयटी आणि एनआयटीच्या कुलगुरू आणि प्राचार्यांना अभ्यास संशोधन करण्याची विनंती केली आहे. हे आपल्यासाठी आव्हान असून आपण ते नक्की पूर्ण करू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. संस्कृत ही प्रमाण भाषा असून लवकरच ती संगणकासाठी वापरली जाईल असे नासा या संस्थेने सांगितले आहे. त्यामुळे भविष्यात संगणक टिकणार असेल तर तो फक्त संस्कृतच्या आधारावर टिकेल असेही ते म्हणाले, अणूसारखी महत्वाची संकल्पना चरक ऋषींनी जगाला दिली. आपल्या परंपरा जर इतक्या उदात्त आहेत तर त्या जगाला का सांगायच्या नाहीत असा सवालही त्यांनी केला.