उत्तम कलाकार हरपला, मान्यवरांनी विजू खोटे यांना वाहिली श्रद्धांजली

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2019 06:09 AM2019-10-01T06:09:25+5:302019-10-01T06:10:51+5:30

विजू खोटे यांचा जन्म १७ डिसेंबर १९४१ रोजी झाला. ‘या मालक’ या १९६४ मध्ये प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटातून त्यांनी आपल्या करिअरला सुरुवात केली. गेल्या ५५ वर्षांपासून त्यांनी सिनेसृष्टीत अनेक भूमिका साकारल्या.

Great artist Lost, dignitaries pay tribute to Viju Khote | उत्तम कलाकार हरपला, मान्यवरांनी विजू खोटे यांना वाहिली श्रद्धांजली

उत्तम कलाकार हरपला, मान्यवरांनी विजू खोटे यांना वाहिली श्रद्धांजली

Next

मुंबई : विजू खोटे यांचा जन्म १७ डिसेंबर १९४१ रोजी झाला. ‘या मालक’ या १९६४ मध्ये प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटातून त्यांनी आपल्या करिअरला सुरुवात केली. गेल्या ५५ वर्षांपासून त्यांनी सिनेसृष्टीत अनेक भूमिका साकारल्या.

छोट्या पडद्यावरील ‘जबान संभालके’ या मालिकेतही त्यांनी अतिशय उत्तम अभिनय केला होता. विशेष म्हणजे चित्रपटाप्रमाणे मराठी नाट्यसृष्टीही त्यांनी गाजवली. ‘अनोखी रात’, ‘जीने के राह’, ‘शरीफ बदमाश’, ‘इन्सानियत’, ‘तपस्या’, ‘कर्ज’, ‘अंदर बाहर’ यासह अनेक हिंदी चित्रपटांत त्यांनी काम केले. सिनेसृष्टीत चार दशकांहून अधिक वावरतानाही ते प्रत्येक भूमिकांचा अभ्यास करत असत.

‘आमच्यासारखे आम्हीच’, ‘आयत्या घरात घरोबा’, ‘अदलाबदली’ यासारख्या मराठी चित्रपटांत ते वेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारू शकले. कोणतीही भूमिका करताना त्याची कथा आणि संहिता चांगली असायला हवी असा त्यांचा आग्रह असायचा. गँगस्टर, डाकू, डॉनचा उजवा-डावा हात, विमा एजंट यासारख्या अनेक चित्रपटांत त्यांनी उत्तम कामगिरी केली आहे.

‘भगतसिंग’ या चित्रपटात केवळ एका दृश्यासाठी काम करताना त्यांना कुठेही मानहानी झाल्याप्रमाणे वाटले नाही.

कारकिर्दीच्या सुरुवातीला चांगल्या भूमिकांच्या शोधात असलेल्या विजू खोटेंनी लहान भूमिकादेखील अत्यंत उत्तमपणे साकारल्या. १९९० च्या दशकात ‘अंदाज अपना अपना’ चित्रपटात त्यांनी साकारलेले ‘रॉबर्ट’चे पात्र विशेष गाजले होते. ‘अशी ही बनवाबनवी’ या सुपरहिट मराठी चित्रपटात त्यांनी बळी नावाचा खलनायक साकारला होता. अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी खलनायकाची भूमिकाही अतिशय उत्तमपणे वठवली होती. अभिनय कौशल्य आणि संवादफेक अप्रतिम असल्याने या भूमिका प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहिल्या. ‘मस्करी’, ‘आयत्या घरात घरोबा’, ‘धडाका’, ‘घनचक्कर’, ‘एक गाडी बाकी अनाडी’, ‘इना मिना डिका’, ‘भुताचा भाऊ’, ‘चंगू मंगू’, ‘सगळीकडे बोंबाबोंब’ इत्यादी मराठी तसेच ‘सच्चा झूठा’, ‘फांदेबाज’ इत्यादी अनेक हिंदी चित्रपटांत भूमिका साकारल्या. रंगभूमी, दूरचित्रवाणीवर तसेच काही जाहिरातींमध्येही त्यांनी कामे केली.

फार्सिकल अभिनयाची उत्तम जाण असणारा कलावंत हरपला
चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांनी मराठी, हिंदी, इंग्रजी नाटक व चित्रपट यामध्ये लीलया व्यक्तिरेखा साकारल्या. त्यांच्या निधनाने फार्सिकल अभिनयाची उत्तम जाण असणारा गुणी कलावंत हरपला. चित्रपटसृष्टी व छोटा पडदा याबरोबरच त्यांनी मराठी नाट्यसृष्टीतही अनेक भूमिका अतिशय उत्तमरीत्या साकारल्या.
- विनोद तावडे, सांस्कृतिक कार्यमंत्री

आठवणी कायम स्मरतील
माझ्यापेक्षा वयाने मोठे असले तरी विजूशी माझी खूप छान मैत्री होती. उमेदीच्या काळात विजू, मी आणि शोभा एकत्र दुचाकीवरून फिरत असू. अमेरिकन सिनेमाविषयी अत्यंत अभ्यासू असलेला विजू खूप ध्येयवेडा होता. त्याच्या आठवणी स्मरतील.
- ऋषी कपूर, अभिनेता

अतीव दु:ख
विजू खोटे यांच्या जाण्याविषयी कळले, अत्यंत दु:ख झाले असून त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. त्यांच्या स्मृती कायम राहतील.
- अनुप जलोटा, गायक-संगीतकार

विद्यापीठ हरपले
विजू खोटे हे व्यक्तिमत्त्व नव्हते तर विद्यापीठच होते. त्यांच्या कामातून ते सतत आपल्यासोबत असतील. मी भाग्यवान आहे, मला त्यांच्यासोबत काही चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्या कुटुंबीयांसोबत माझ्या सहवेदना आहेत.
- अजय देवगण, अभिनेता

मित्र हरपला
खूप चांगला अभिनेता आणि मित्र गमावल्याची भावना आहे.
- परेश रावल, अभिनेता

मिस यू बावा..!
माझा सहकारी विजू खोटे आपल्यात नाही आहे. रंगमंच असो वा सिनेमा, त्याची कारकीर्द कायम अधोरेखित राहिली आहे. याखेरीज, खऱ्या आयुष्यातही तो तितकाच उत्तम माणूस होता. ‘मिस यू बावा.’
- बोमण इराणी, अभिनेता

उत्कृष्ट कलाकार हरपला
विजू खोटे यांना आदरांजली. त्यांच्या जाण्याने आपल्यातून एक उत्तम कलाकार आणि मनोरंजक हरपल्याची भावना आहे.
- राज बब्बर, अभिनेता

Web Title: Great artist Lost, dignitaries pay tribute to Viju Khote

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.