महिला पोलिसांना मोठा दिलासा, आता ८ तासच ड्युटी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2021 07:44 AM2021-09-25T07:44:05+5:302021-09-25T07:44:14+5:30
नागपूर शहरात महिला पोलिसांना प्रायोगिक तत्त्वावर आठ तास ड्युटीचा उपक्रम सुरू केल्यानंतर पोलीस महासंचालक पांडे यांनी पोलीस घटकांनी या निर्णयाबाबत विचार करावा, अशी सूचना केली होती.
मुंबई : महाराष्ट्र सरकारने महिलापोलिसांच्या कामाचे तास १२ तासांवरून ८ तासांवर आणण्याचा निर्णय घेतल्याची माहिती पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी दिली आहे. या निर्णयामुळे महिलापोलिसांना दिलासा मिळाला असून, त्यांच्यात आनंदाचे वातावरण आहे.
नागपूर शहरात महिला पोलिसांना प्रायोगिक तत्त्वावर आठ तास ड्युटीचा उपक्रम सुरू केल्यानंतर पोलीस महासंचालक पांडे यांनी पोलीस घटकांनी या निर्णयाबाबत विचार करावा, अशी सूचना केली होती. त्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांनीही महिला पोलिसांसाठी आठ तासांची ड्यूटी जाहीर केली होती. त्यापाठोपाठ नागपूर, अमरावती आणि नुकतेच नवी मुंबई पोलिसांनीही असा निर्णय घेऊन अंमलबजावणी केली. अखेर राज्य पातळीवर निर्णय घेण्यात आला असून, संपूर्ण राज्य पोलीस दलातील महिला पोलिसांना ८ तासांची ड्युटी मिळणार आहे.
पोलीस दलात कर्तव्य बजावत असलेल्या महिला पोलिसांवर कामाबरोबरच कौटुंबिक जबाबदारीचा भारही आहे. अशात सण-उत्सव बंदोबस्त, गंभीर गुन्हे यानिमित्ताने वर्षभरातून अनेकदा ८ तासांपेक्षा जास्त वेळ कर्तव्य बजावतात. त्यामुळे त्यांची कौटुंबिक जबाबदारी आणि कर्तव्यावर परिणाम होत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे मानसिक ताण वाढत आहे. काही महिला पोलिसांनीही ही बाब वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिली होती.