अतिवृष्टीचा महावितरणला २ कोटींचा फटका !
By admin | Published: October 17, 2016 09:20 PM2016-10-17T21:20:16+5:302016-10-17T21:20:16+5:30
गेल्या तीन वर्षांपासून अतिवृष्टीचा सामना करावा लागलेल्या लातूर जिल्ह्यात यावर्षी तीनवेळा झालेल्या अतिवृष्टीमुळे महावितरणच्या उच्चदाब वाहिनीचे ४०४ तर लघुदाब वाहिनीचे
बाळासाहेब जाधव ,
लातूर, दि. १७ - गेल्या तीन वर्षांपासून अतिवृष्टीचा सामना करावा लागलेल्या लातूर जिल्ह्यात यावर्षी तीनवेळा झालेल्या अतिवृष्टीमुळे महावितरणच्या उच्चदाब वाहिनीचे ४०४ तर लघुदाब वाहिनीचे १५४६ विद्युत खांब कोसळले आहेत. शिवाय, ४० रोहित्र नादुरुस्त झाल्याने १ कोटी ९० लाखांचे नुकसान झाल्यामुळे महावितरणला मोठा फटका सहन करावा लागला आहे.
लातूर परिमंडळात लातूर, बीड, उस्मानाबाद जिल्ह्यांचा समावेश आहे. गेल्या तीन वर्षांपासून दुष्काळाचा सामना करावा लागलेल्या लातूर जिल्ह्यात यावर्षी सप्टेंबर तीनवेळा अतिवृष्टी झाली. यामुळे ५ लाख १७ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्याच्या पंचनाम्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, गावोगावी विद्युत पुरवठा करणाऱ्या महावितरणलाही या अतिवृष्टीचा फटका बसला आहे. लातूर जिल्ह्यात उच्चदाब वाहिनीचे ४०४ विद्युत खांब कोसळले आहेत. तर लघुदाब वाहिनीचे १५४६ खांब कोसळले आहेत. शिवाय, विविध गावांतील ४० रोहित्र नादुरुस्त झाल्याने या भागातील नागरिकांची गैरसोय झाली. तीन टप्प्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे ६५.५५ किलोमीटर लांबीच्या विद्युत वाहिन्या नादुरुस्त झाल्या आहेत.
यात लातूर जिल्ह्यात महावितरणचे १ कोटी ९० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. लातूरबरोबरच बीड जिल्ह्यालाही अतिवृष्टीचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. उच्च व लघुदाब वाहिनीचे १४१६ पोल नादुरुस्त झाले आहेत. तर ४५ रोहित्र नादुरुस्त झाले आहेत. ८४.५२ किलोमीटरच्या विद्युत वाहिन्या नादुरुस्त झाल्या असून, बीड जिल्ह्यात महावितरणचे ३० लाखांचे नुकसान झाले आहे. तर उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा मोठा फटका बसला असून, १५ रोहित्र खराब झाले आहेत. तसेच अनेक ठिकाणचे विद्युत पोलही उखडून पडल्याने किमान ३५ लाखांचे नुकसान झाले आहे.
लातूरबरोबर बीड व उस्मानाबादमध्येही अतिवृष्टीचा फटका बसला आहे. येथील उच्च व लघुदाबाचे पोल उखडून पडले आहेत. तर ६० रोहित्र नादुरुस्त झाले आहेत. तसेच वीज वाहिन्याही तुटल्याने दोन्ही जिल्ह्यांतून ६५ लाखांचा फटका महावितरण कार्यालयास बसला आहे.
गेल्या चार-पाच वर्षांपासून दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या मराठवाड्यातील लातूर, बीड व उस्मानाबाद या तीन जिल्ह्यांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. यामध्ये किमान २ कोटी ५५ लाखांचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी रोहित्र नादुरुस्त झाल्याने अनेक गावे अंधारात होती. दरम्यान, महावितरणची यंत्रणा लावून या गावांतील वीज वाहिन्या व रोहित्र दुरुस्तीचे काम प्रगतीपथावर सुरू केले आहे. यामुळे काही गावांतील विद्युत प्रवाह सुरळीत झाला आहे. तर उर्वरित ठिकाणचेही काम प्रगतीपथावर सुरू असल्याने नागरिकांची सोय झाली असल्याचे महावितरण लातूर परिमंडळाचे मुख्य अभियंता अनिल भोसले यांनी लोकमतशी बोलताना सांगितले