दादांपेक्षा साहेब मोठे!
By admin | Published: August 6, 2016 01:07 AM2016-08-06T01:07:34+5:302016-08-06T01:07:34+5:30
अखंड महाराष्ट्राचा ठराव करून महापालिकेची सभा तहकूब करण्याचा पक्षाचा आदेश महापौर शकुंतला धराडे यांनी धुडकावून लावला.
पिंपरी : अखंड महाराष्ट्राचा ठराव करून महापालिकेची सभा तहकूब करण्याचा पक्षाचा आदेश महापौर शकुंतला धराडे यांनी धुडकावून लावला. सभा सुरू राहू द्या, असा आग्रह धरला. महापौर आणि सत्ताधारी राष्ट्रवादीचे सदस्य यांच्यात जोरदार वादावादी झाली. महापौरांनी राष्ट्रवादीला कोंडीत पकडले. सभा तहकुबीच्या मुद्द्यावरून महापौरांमुळे राष्ट्रवादी अडचणीत आली. सभा संपताच मला दादांपेक्षा साहेब मोठे आहेत, असे विधान केले. त्यामुळे महापौरांच्या राजीनाम्याची मागणी राष्ट्रवादीसह शिवसेना, भाजपाच्या नगरसेवकांनी केली आहे.
सभा तहकुबीच्या मुद्द्यावरून गेल्या महिन्यात महापौर विरुद्ध राष्ट्रवादी असे चित्र निर्माण झाले होते. पक्षादेश न पाळणाऱ्या महापौरांचा निषेध सभात्याग करून राष्ट्रवादीने केला होता. तहकूब सभा आज होती. अध्यक्षस्थानी महापौर होत्या. प्रारंभी कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार घटना, महाड येथील पूल दुघर्टनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली. दहा मिनिटांसाठी तहकूब केली. त्यानंतर सभा पुन्हा सुरू झाली. त्या वेळी प्रशांत शितोळे यांनी अखंड महाराष्ट्राचा ठराव करण्याचा प्रस्ताव मांडला. शितोळे म्हणाले, ‘‘महाराष्ट्रात आता काळीमा फासणाऱ्या घटना मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटत आहेत. महाराष्ट्राचे तुकडे करण्याचे काम केंद्रातील आणि राज्यातील सरकार करीत आहे. ही गोष्ट लाजीरवाणी आहे. तसेच राज्यातील पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्यात यावे. आम्ही महाराष्ट्राचे घटक आहोत. त्यामुळे अखंड महाराष्ट्र राहावा.’’
अखंड महाराष्ट्राच्या मुद्द्यावर बोलत असताना सीमा सावळे म्हणाल्या, ‘‘कोण करतेय महाराष्ट्राचे तुकडे? असा कोणताही ठराव सरकारकडे नाही. ही दिशाभूल आहे.’’ त्यावर मला बोलू द्या. माझ्यानंतर तुम्ही बोला, असे शितोळे म्हणाले. शितोळे म्हणाले, ‘‘ महाराष्ट्राचे तुकडे कोणीही करीत असेल, तर नागरिक म्हणून आपण या गोष्टीचा विरोध करायला हवा. महाराष्ट्राचे विभाजन करण्याच्या संदर्भातील राज्य आणि केंद्र सरकारच्या निषेधाचा ठराव करून ही सभा तहकूब करावी, अशी मागणी केली. त्यानंतर योगेश बहल यांनी तहकुबीची सूचना महापौरांनी स्वीकाराची, अशी मागणी केली. या वेळी अनेक सदस्यांनी बोलण्यासाठी हात वर केले.
भाऊसाहेब भोईर म्हणाले, ‘‘अखंड महाराष्ट्र आहे. तो अखंडच राहावा. महाराष्ट्राचे विभाजन करण्यास विरोध आहे. त्याचबरोबर महाड दुर्घटनेवरून आपण बोध घ्यायला हवा. शहरातील जुन्या पुलांचे नव्हे, तर नवीन पुलांचेही आॅडिट करावे. त्यांची वयोमर्यादा काय, ते तपासून पाहावे. तसेच आपल्या शहरात मोठे पूल आहेत. ते विख्यात ठेकेदारांनी बांधले आहेत. त्यांचेही आॅडिट करायला हवे. तसेच शहरातील विविध भागांत अनधिकृत बांधकामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. त्यावर अधिकाऱ्यांचा वचक नाही. भरारी पथक फेरारी पथक आहे. तसेच महिन्यापूर्वी झालेल्या रस्त्यांवरही खड्डे पडले आहेत. अशा ठेकेदारांवर कारवाई करा.’’ त्यानंतर ‘महापौर तहकु बीची सूचना स्वीकारा, असे बहल म्हणाले. मात्र, तहकुबीची सूचना न स्वीकारताच सीमा सावळे यांना बोलण्याची संधी दिली.
सावळे म्हणाल्या, ‘‘सत्ताधाऱ्यांनी केलेल्या खोट्या ठरावाला विरोध आहे.’’ यावर पुन्हा बहल, सत्तारूढ पक्षनेत्या मंगला कदम, उल्हास शेट्टी, प्रशांत शितोळे यांनी तहकुबीची सूचना स्वीकारा, असे सुचविले. मात्र, ‘श्रद्धांजलीचा ठराव झाला आहे. सभा सुरू राहू द्या. (बहल यांना उद्देशून) तुम्हीही महापौर होतात. सभा सुरू ठेवायची की तहकूब करायची, हा माझा अधिकार आहे. ,’’ असे महापौर म्हणाल्या. तहकूबी फेटाळली. त्यानंतर काही काळ महापौर आणि सत्ताधारी नगरसेवक यांच्यात शाब्दिक वादावादी झाली. सर्व नगरसेवक उठून बाहेर जायला लागले. त्या वेळी महापौर म्हणाल्या, ‘‘ही सभा होणारच आहे. तो अधिकार माझा आहे, सभागृहातून जायचय त्यांनी जा.’’ त्यानंतर काही ज्येष्ठ सदस्य महापौरांजवळ गेले. त्याच वेळी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी महापौरांजवळ जाऊन सभा संपवा, अशी खूण केली. त्यानंतर सभा तहकुबीची सूचना महापौरांनी स्वीकारली. त्यानंतर शिवसेना आणि भाजपाच्या नगरसेवकांनी जोरदार घोषणाबाजी केली.(प्रतिनिधी)
>पार्क स्ट्रीटमुळे वाद : भाजपासंबंधित बिल्डर
वाकड येथील पार्क स्ट्रीटला रस्त्यासाठी जागा देण्याचा विषयावरून महापौर शकुंतला धराडे आणि सत्ताधाऱ्यांत वादावादी झाली. संबंधित विषय मंजूर करावा, असा दूरध्वनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी केल्याने सभा तहकूब न करण्याचा महापौरांचा विचार होता. याच वेळी सभा तहकूब करण्याविषयी सूचना देण्यासाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही महापौरांना दूरध्वनी केला. मात्र, हा दूरध्वनी त्यांनी घेतला नाही. त्यावर ‘दादांपेक्षा साहेब मोठे,’ असे स्पष्टीकरण महापौरांनी माध्यमांना दिले.
महापौरांनी सभा तहकुबीची सूचना का स्वीकारली नाही, याबाबत महापालिका वर्तुळात चर्चा होती. या घटनेचा मागोवा घेतला असता तहकुबीवरून जे वादळ झाले, त्याचे कारण वाकड येथील पार्क स्ट्रीटला महापालिकेच्या आरक्षणातील रस्ता देण्याचा शहर सुधारणा समितीचा विषय आजच्या विषयपत्रिकेवर होता. हा विषय भाजपाच्या नेत्यासंबंधित एका बिल्डरचा आहे. त्यामुळे तो मंजूर करायचा नाही, यावर सत्ताधाऱ्यांचे एकमत झाले. त्यांनी याबाबत महापौरांनाही सूचना दिली होती. मात्र, महापौरांनी सभा रेटून नेण्याचा प्रयत्न केला. यावरून महापौर आणि सत्ताधारी यांच्यात वादावादी झाली.