कौतुकास्पद..! कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी महामेट्रो देणार एका दिवसाचे वेतन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2020 05:18 PM2020-03-24T17:18:54+5:302020-03-24T17:27:20+5:30
कोरोना विरुद्ध लढण्यासाठी एक सकारात्मक पाऊल
पुणे : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्याकरिता भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन प्रयत्नशील आहे. याच अनुषंगाने महामेट्रो देखील नागरिक तसेच कर्मचाऱ्यांकरिता उपायोजना करीत आहे. याच अंतर्गत महाराष्ट्र मेट्रो रेल कॉपोर्रेशन लिमिटेड पुणे व नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाकडून मुख्यमंत्री महाराष्ट्र सहायता निधीमध्ये कोरोना विरुद्धच्या लढाईसाठी १२ लाखांची मदत स्वरुपात देणार असल्याचे महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.ब्रिजेश दीक्षित यांनी आज जाहीर केले. मुख्यमंत्री निधीकरिता महामेट्रोचे अधिकारी आणि कर्मचारी एक दिवसाचा पगार मदतीच्या स्वरुपात प्रदान करणार आहे.
महामेट्रो येथे सुरुवातीपासूनच स्वच्छता संदर्भात विविध उपाय योजना केल्या असून कोरोना चा उद्रेक झाल्यापासून या उपाय योजनांमध्ये आणखी वाढ करण्यात आली आहे. कोरोना विषाणू प्रकोप एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीद्वारे पसरू नये म्हणून महा मेट्रोने नागपुर येथील प्रवासी फेऱ्या ३१ मार्च पर्यंत बंद ठेवल्या आहे. मेट्रो कार्यालय येथे इंफ्रारेड थर्म मीटरद्वारे कर्मचाऱ्यांचे थर्मल स्कॅनिंग केल्या जात आहे. कार्यालय, कार्यस्थळ आणि कामगार कॉलनी येथे वरिष्ठांनी दिलेल्या निदेर्शानुसार नियमितपणे साफ-सफाई आणि औषधीची फवारणी करून औषधी आणि सॅनिटायजर उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच सोशल मिडीया द्वारे जनजागृती केल्या जात आहे. या व्यतिरिक्त कोरोना विषाणूच्या बचावापासूनची माहिती स्टेशन सूचना फलक द्वारे केल्या जात आहे. ३१ मार्च २०२० पर्यत मेट्रो सेवा बंद करण्याचा निर्णय विषाणूचा प्रसार थाबविण्याकारिता महत्वपूर्ण योगदान ठरेल.