‘बाजीराव-मस्तानी’ला हिरवा कंदील
By admin | Published: December 19, 2015 12:22 AM2015-12-19T00:22:25+5:302015-12-19T00:22:25+5:30
संजय लीला भन्साली दिग्दर्शित ‘बाजीराव - मस्तानी’ चित्रपट प्रदर्शित करण्यास शुक्रवारी उच्च न्यायालयाने हिरवा कंदील दाखवला. मात्र संजय लीला भन्साली, रणवीर सिंह, प्रियांका चोप्रा, दीपिका
मुंबई : संजय लीला भन्साली दिग्दर्शित ‘बाजीराव - मस्तानी’ चित्रपट प्रदर्शित करण्यास शुक्रवारी उच्च न्यायालयाने हिरवा कंदील दाखवला. मात्र संजय लीला भन्साली, रणवीर सिंह, प्रियांका चोप्रा, दीपिका पदुकोण यांना एका आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देश हायकोर्टाने दिले.
राज्य सरकार, सेंट्रल बोर्ड आॅफ फिल्म सर्टिफिकेशनचे अध्यक्ष, निर्माते-दिग्दर्शन संजय लीला भन्साली, अभिनेता रणवीर सिंह, अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि दीपिका पदुकोण हे या याचिकेत प्रतिवादी आहेत. यांना एका आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देश न्या. नरेश पाटील व न्या. एस. बी. शुक्रे यांच्या खंडपीठाने दिले.
पुण्याचे सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी या चित्रपटाच्या ‘पिंगा’ आणि ‘मल्हारी’ या गाण्यावर आक्षेप घेतला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार,या गाण्यांद्वारे बाजीराव पेशवे आणि त्यांच्या पत्नींबद्दल चुकीची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता.
काशीबाई आणि मस्तानी कधीच एकत्र नाचल्या नाहीत. मात्र या चित्रपटात त्यांना एकत्र नाचताना दाखवले आहे. लोकांपुढे चुकीच्या पद्धतीने इतिहास सादर करण्यात आला आहे. हा महाराष्ट्रीय स्त्रियांचाच एकप्रकारे अनादर आहे. एका गौरवशाली इतिहासाचा अपमान करण्यात आल्याचेही याचिकेमध्ये म्हटले आहे. चित्रपटामधील काही घटना, दृश्ये काल्पनिक दाखवण्यात आली आहेत, असेही याचिकेत म्हटले आहे. मात्र चित्रपट प्रदर्शित झाल्याने खंडपीठाने यात हस्तक्षेप करण्यास नकार दिला. (प्रतिनिधी)
मुख्यमंत्र्यांच्या पत्नीची दाद
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांना मात्र एक प्रेक्षक म्हणून मला ‘बाजीराव मस्तानी’ सिनेमा आवडला. आता जो काही वाद सुरू आहे, त्यादृष्टीने मी तुलना केलेली नाही. फक्त मनोरंजन म्हणून मी त्या चित्रपटाकडे पाहिले. जर तुम्ही इतिहास म्हणून विचारत असाल तर माझे असे कोणतेही मत या सिनेमाबद्दल नाही, असे अमृता फडणवीस यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या पत्नीच्या भूमिकेमुळे मात्र भाजपा कार्यकर्त्यांची कोंडी होऊ शकते.