‘घोडबंदर’च्या दुरूस्तीला हिरवा कंदील
By Admin | Published: April 6, 2017 02:42 AM2017-04-06T02:42:25+5:302017-04-06T02:42:25+5:30
राज्य सरकारच्या पुरातत्व विभागाने हिरवा कंदील दाखविल्याने पालिका आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी दुरुस्तीला मान्यता दिली आहे
भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिका हद्दीत असलेल्या घोडबंदर किल्ल्याच्या दुरुस्तीला राज्य सरकारच्या पुरातत्व विभागाने हिरवा कंदील दाखविल्याने पालिका आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी दुरुस्तीला मान्यता दिली आहे. मात्र त्याचा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी येत्या महासभेत सादर करण्यात येणार असल्याने महासभेच्या मान्यतेनंतरच सुमारे १ कोटी ८१ लाखांची तरतूद करण्यात येणार आहे.
हा किल्ला राज्य सरकारकडून संरक्षित स्मारक म्हणून जाहीर करण्यात आला आहे. सध्या किल्याची मोठ्या प्रमाणात पडझड झाली असून तो देखभाल व दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. सध्या तो राज्याच्या पर्यटन विभागाच्या अखत्यारीत आहे. मात्र त्याच्या मूळ दुरुस्तीचे अधिकार राज्याच्या पुरातत्व विभागाकडे असल्याने या विभागाच्या परवानगीनंतरच त्याची दुरुस्ती होण्याची शक्यता आहे.
यापूर्वी तीन वेळा पर्यटन विभागाने किल्ल्याच्या दुरुस्तीचा प्रयत्न केला होता. परंतु, त्यात तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने आजही तो योग्य दुरुस्तीअभावी उभा आहे. दरम्यान, हा किल्ला पर्यटनाच्या माध्यमातून विकसित करुन किल्याला नवसंजीवनी देण्यासाठी आमदार प्रताप सरनाईक यांनी २०१२ पासून राज्य सरकारसह जिल्हा प्रशासन व पालिकेकडे पाठपुरावा केला. त्यात किल्ल्याच्या दुरुस्तीसह त्याच्या परिसरात असलेली सुमारे पाच एकर जमिनीचे सुशोभीकरण जिल्हा प्रशासन व पालिकेच्या संयुक्त निधीतून करण्याची मागणी करण्यात आली होती.
सध्या ही जमीन राज्याच्या महसूल विभागाच्या अखत्यारित आहे. किल्ला दुरुस्ती व सुशोभीकरणाला दोन्ही प्रशासनाने मान्यता दिल्यानंतर महसूल विभागाकडे असलेली ती जमीन पालिकेकडे हस्तांतरित करण्याचे निर्देश राज्याच्या नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांनी गेल्या वर्षी जिल्हा प्रशासनाला दिले.
सध्या त्या जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया सरकारच्या पातळीवर सुरू आहे.तसेच किल्ल्याच्या दुरुस्तीसाठी राज्याच्या पुरातत्व विभागाची परवानगी आवश्यक ठरल्याने सरनाईक यांनी त्या विभागासह पुन्हा राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरु केला. अखेर पुरातत्व विभागाने किल्ल्याच्या दुरुस्तीला तत्वत: मंजुरी दिली. त्यामुळे किल्ल्याच्या संभाव्य दुरूस्तीसाठी पालिका आयुक्तांनी १ कोटी ८१ लाख ६७ हजार ९३० रुपये निधीची तरतूद करण्याला नुकतीच मान्यता देण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
>शिवसृष्टीचा देखावा
या कामासाठी तांत्रिक सल्लागार म्हणून मेसर्स संक्रमण डिझाईन स्टडिओ कंपनीची नियुक्ती केली. किल्ल्याची योग्य पद्धतीने दुरुस्ती करून त्याच्या लगतच्या परिसरात शिवसृष्टीचा देखावा उभारण्यात येणार आहे.
तसेच त्या ठिकाणी अद्ययावत उद्यान विकसित करण्यात येणार असल्याने हे ठिकाण पर्यटनस्थळ म्हणून घोषित करण्यात येणार आहे.
त्याला तत्कालीन जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आल्याचे आमदार प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले.