तलाठी, मंडल अधिकारी नियुक्तीला हिरवा कंदील; राज्य सरकारनं दिली मंजुरी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2022 06:51 AM2022-12-09T06:51:24+5:302022-12-09T06:51:45+5:30
३११० तलाठी व ५१८ मंडल अधिकारी यांची होणार भरती
कोल्हापूर : राज्यात ३११० तलाठी सज्जा व ५१८ मंडळ अधिकारी नियुक्त करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. बुधवारी त्यासंबंधीचा शासनादेश महसूल विभागाने काढला.
महाराष्ट्र राज्य तलाठी महासंघाने २०१४ मध्ये नवीन तलाठी सज्जा व मंडळ अधिकारी नियुक्त करण्याची मागणी केली होती. ती प्रत्यक्षात येण्यासाठी आठ वर्षे गेली. म्हणजेच ‘सरकारी काम आणि सहा महिने थांब’ हा अनुभव खुद्द तलाठ्यांनाही आला. नाशिक महसूल विभागात सर्वाधिक ६८९ सज्जा आणि ११५ मंडळे स्थापन होणार आहेत.
तलाठी महासंघाने २०१४ मध्ये मागणी केल्यावर शासनाने त्यासाठी नागपूर विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. त्याचा अहवाल दोन वर्षांनी २०१६ मध्ये आला. या अहवालाचा अभ्यास करून निर्णय घेण्यासाठी महसूल मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती नेमण्यात आली. या उपसमितीने २०१७ मध्ये अहवाल दिला. त्याचवेळी मंजूर करण्यात आलेल्या पदांचा शासनादेश ७ डिसेंबर २०२२ ला निघाला.
महसुली गावनिहाय तलाठी सज्जा निर्माण करण्याचा शासनाचा निर्णय चांगलाच आहे. त्यामुळे लोकांना गावांत तलाठी भेटतील. त्यांची कामे होतील. - धनाजी कलिकते,कोल्हापूर जिल्हा तलाठी महासंघाचे नेते.