हरित मुंबई-स्वच्छ मुंबईचा संकल्प

By Admin | Published: July 2, 2016 02:28 AM2016-07-02T02:28:51+5:302016-07-02T02:28:51+5:30

वाढती लोकसंख्या, वाढते औद्योगिकीकरण आणि शहरीकरणामुळे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे.

Green Mumbai - Clean Mumbai Resolution | हरित मुंबई-स्वच्छ मुंबईचा संकल्प

हरित मुंबई-स्वच्छ मुंबईचा संकल्प

googlenewsNext


मुंबई : वाढती लोकसंख्या, वाढते औद्योगिकीकरण आणि शहरीकरणामुळे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे. तथापि पुढील पिढीला स्वच्छ हवा, स्वच्छ पाणी आणि निरोगी जीवन मिळावे म्हणून शुक्रवारी एकत्र आलेल्या मुंबईकरांनी ठिकठिकाणी झाडे लावत वृक्षारोपणाचा श्रीगणेशा केला. मुंबई महापालिकेतर्फे सुमारे ६ हजार वृक्षांची लागवड करण्यात आली. हरित मुंबई-स्वच्छ मुंबईसाठी जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन महापौर स्नेहल आंबेकर यांनी यानिमित्ताने केले. महापालिकेकडून या एक महिन्याच्या काळात २४ विभाग कार्यालयांत उद्यान विभागाकडून वृक्षरोपट्यांचे मोफत वाटप करण्यात येणार आहे.
वन महोत्सवाच्या निमित्ताने वन विभागातर्फे राज्यभरात दोन कोटी वृक्ष लावले जात असतानाच मुंबईकरांनीही या मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद दिला. शुक्रवारी सकाळपासूनच शहर आणि उपनगरात ठिकठिकाणी वृक्षारोपणाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. मुंबई महापालिकेतर्फे भाटिया बाग येथे स्थानिक नगरसेवक गणेश सानप, उपआयुक्त सुधीर नाईक यांच्या हस्ते विविध प्रजातींच्या १२ झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. अतिरिक्त आयुक्त पल्लवी दराडे यांच्या हस्ते हॉर्निमन सर्कल महापालिका उद्यानात वृक्षारोपण करण्यात आले. कुर्ला (पूर्व) नेहरूनगर येथे उपआयुक्त भारत मराठे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट कॅम्पसमध्ये वृक्षारोपण तर विद्यानगरी कॅम्पसमध्ये कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी वृक्षारोपण केले. सोन-मोहोर या प्रजातीचे एकूण १०० वृक्ष या वेळी लावण्यात आले. वृक्षारोपणात एनएसएसच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
केईएम रुग्णालयातील रोजंदारी सफाई कामगारांनी केईएम रुग्णालयात २५ औषधी वनस्पतींचे रोपण केले. पुढील दोन ते तीन दिवसांत अजून ७५ औषधी वनस्पतींचे रोपण करण्यात येणार आहे. आवळा, जांभूळ, सोनचाफा, सिल्व्हर ओक, पोलार, वेत या वृक्षांचा समावेश आहे. या कार्यक्रमाला महापालिका प्रमुख रुग्णालयांचे संचालक डॉ. अविनाश सुपे, उपअधिष्ठाता डॉ. मिलिंद साळवे उपस्थित होते. आरोग्य भवनातही वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
महावितरणच्या सोळा परिमंडळांतर्गत विविध कार्यालयांत सुमारे एक लाखापेक्षा अधिक वृक्षांचे रोपण करण्यात आले. मुंबईमधील प्रकाशगड या मुख्यालयात महावितरणचे अध्यक्ष संजीव कुमार यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. म्हाडातर्फेही विरार-बोळिंज येथील गृहप्रकल्पात सुमारे एक हजार वृक्षांची लागवड करण्यात आली. वांद्रे पूर्व येथील मुख्यालयाच्या परिसरातही म्हाडाचे उपाध्यक्ष संभाजी झेंडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तर भारतनगर, मुलुंड गव्हाणपाडा, कन्नमवार नगर येथील संक्रमण शिबिराच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
मालाड पूर्व आणि पश्चिम येथील सुमारे १५० डॉक्टरांचा तुळशीचे रोपटे देऊन मुंबई भाजपाचे सरचिटणीस अमरजीत मिश्रा यांनी गौरव केला. या वेळी नेत्रचिकित्सक डॉ. श्याम अगरवाल यांनाही तुळशीचे रोपटे देण्यात आले. डॉ. अनुज, उत्तर मुंबई भाजपाचे सरचिटणीस गणेश खणकर, मालाड भाजपा सरचिटणीस सतीश पुरोहित, संजय देसाई, प्रभाग अध्यक्ष यग्नेश त्रिवेदी या वेळी उपस्थित होते.
मोतीलाल नगर क्रमांक १ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान, गणेश मैदान आणि अण्णाभाऊ साठे मैदान येथे सिनेकलाकार उत्कर्षा नाईक आणि केतन करंडे यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. कडुनिंब, निवडुंग, गुलमोहर, करंज, कांचन, ताम्हण अशा विविध प्रकारच्या ५०० झाडांची लागवड करण्यात आली. या वेळी स्थानिक नगरसेविका प्रमिला शिंदे उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)
>एसएनडीटीमध्ये वृक्षारोपण
जुहू येथील एसएनडीटीमध्ये एटीएसचे पोलीस उपायुक्त धनंजय कुलकर्णी यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला. या वेळी १०० फळांच्या झाडांची रोपे लावण्यात आली. विद्यापीठाचे प्राचार्य सचिन लढ्ढासह कर्मचारी वर्ग या वेळी उपस्थित होते.

Web Title: Green Mumbai - Clean Mumbai Resolution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.