'सामाजिक न्यायाचा नवा अध्याय लिहिणाऱ्या छत्रपती शाहू महाराजांना विनम्र अभिवादन'
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2020 09:03 AM2020-06-26T09:03:54+5:302020-06-26T09:04:55+5:30
सर्व जातींच्या पुढाऱ्यांना माझे सांगणे आहे की, आपली दृष्टी दूरवर ठेवा, पायापुरते पाहू नका. जातिभेद मोडणे इष्ट आहे.
मुंबई - छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सोशल मीडियातून त्यांना आंदरांजली वाहण्यात येत आहे. फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि ट्विटरच्या माध्यमातून शाहू महाराजांच्या कार्याची आणि त्यांच्या आठवणींची माहिती देत, त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. कोल्हापूरच्या राजघराण्यातील वंशज छत्रपती संभाजीराजे यांनीही आपल्या फेसबुक आणि ट्विटर अकाऊंटवरुन जातीभेद नष्ट करण्यासाठी शाहू महाराजांनी केलेल्या कार्याची आठवण करुन देत, आजच्या परिस्थितीतही शाहू महाराजांचे विचार तंतोतंत लागू पडत असल्याचे म्हटले आहे.
"सर्व जातींच्या पुढाऱ्यांना माझे सांगणे आहे की, आपली दृष्टी दूरवर ठेवा, पायापुरते पाहू नका. जातिभेद मोडणे इष्ट आहे. जरुर आहे, जातिभेद पाळणे हे पाप आहे. देशोन्नतीच्या मार्गात हा अडथळा आहे. हा दूर करण्याचे प्रयत्न जोराने केले पाहीजे. ही जाणिव पक्की ध्यानात ठेवून मग ह्या दिशेचा प्रयत्न म्हणून जातिपरिषदा भरवा. जातिबंधन दृढ करणे, जातिभेद तीव्र होणे हा परिणाम ह्या परिषदांचा होऊ नये ही खबरदारी घेतली पाहिजे." राजर्षी शाहु छत्रपती महाराजांनी नाशिक येथील वसतिगृहाचा शुभारंभ करते वेळी केलेले हे उद्गार आजच्या परिस्थितीतही तंतोतंत लागू होतात. आज या लोकोत्तर महापुरुषाची जयंती. यानिमित्त माझ्याकडून व छत्रपती परिवाराकडून त्रिवार मुजरा!!!''
अशा माहितीपर ट्विट करुन छत्रपती संभाजीराजेंनी शाहू महाराजांना अभिवादन केले आहे. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि खासदार शरद पवार यांनीही आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन जयंतीदिनी शुभेच्छा दिल्या आहेत. सामाजिक न्यायाचा नवा अध्याय लिहीणाऱ्या छत्रपती शाहू महाराजांना विनम्र अभिवादन, असे पवार यांनी म्हटलं आहे.
शिक्षणाद्वारे जातिभेद निर्मूलन, बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी त्यांना नोकऱ्यांमध्ये आरक्षण, स्त्रियांच्या प्रगतीसाठी स्त्री शिक्षणास प्रोत्साहन अशा विधायक कार्याद्वारे सामाजिक न्यायाचा नवा अध्याय लिहीणाऱ्या छत्रपती राजर्षी शाहू महाराजांना जयंती दिनी विनम्र अभिवादन. pic.twitter.com/BSN0HF5ewk
— Sharad Pawar (@PawarSpeaks) June 26, 2020
भाजापा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही ट्विटर अकाऊंटवरुन आंदरांजली वाहिली आहे. तर, सोशल मीडियातूनही मोठ्या प्रमाणात छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीदिनी अभिवादन करण्यात येत आहे.
कर्तव्यदक्ष लोकराजा आणि थोर समाजसुधारक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची आज जयंती. महाराजांनी कृषी व्यवस्थपनामध्ये विशेष योगदान दिले होते. त्यांनी शेतीचे विविध प्रयोग करून त्यावर संशोधन केले. #ShahuMaharajJayantipic.twitter.com/sSGJhbwqjX
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) June 26, 2020