"महाराष्ट्राच्या विकासाचा पुनश्च श्रीगणेशा करूया, कितीही आव्हानं येऊ देत..."

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2022 06:21 PM2022-08-30T18:21:41+5:302022-08-30T18:22:04+5:30

विकासाचा पुनश्च, श्रीगणेशा करण्याचा संकल्प करूया, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून गणेशोत्सवाच्या शुभेच्छा

Greetings from Chief Minister Eknath Shinde to the citizens of Ganeshotsav | "महाराष्ट्राच्या विकासाचा पुनश्च श्रीगणेशा करूया, कितीही आव्हानं येऊ देत..."

"महाराष्ट्राच्या विकासाचा पुनश्च श्रीगणेशा करूया, कितीही आव्हानं येऊ देत..."

googlenewsNext

मुंबई - महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या गणरायाच्या कृपेने गेल्या दोन वर्षातले कोरोना संकटाचे मळभही आता दूर झाले आहेत. त्यामुळे यंदा आपण गणरायाचे उत्साहात, जल्लोषात आणि निर्बंधमुक्त वातावरणात स्वागत करत आहोत. गणरायाचे  आगमन आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि समाधान घेऊन येवो याशब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, लाडक्या गणरायाचे स्वागत करताना, महाराष्ट्राच्या विकासाचा पुनश्च श्रीगणेशा करण्याचा संकल्प करूया. त्यासाठी आपण सर्व एकजुटीने आणि कोणत्याही आव्हानाची तमा न बाळगता प्रयत्न करूया. उत्सव साजरा करताना सामाजिक भान जपणं देखील आवश्यक आहे. आरोग्य, शिक्षण, पर्यावरण यासारख्या विषयांवर सार्वजनिक गणेश मंडळांनी भर देऊन जनजागृती करावी असं आवाहन त्यांनी केले. 

तसेच आपल्या सर्वांच्या साक्षीनं महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचा दृढ संकल्प केला असून त्याच्यापूर्तीसाठी आपल्या मनातलं आमचं सरकार सर्वतोपरी प्रयत्नशील आहे. राज्याच्या विकासाचं मनोरथ पूर्णत्वास जाण्यासाठी आपली साथही हवी आहे. कोरोना संकटामुळं मंदावलेली विकासाची गती आपल्याला पुन्हा गाठायची आहे. त्यासाठी कितीही आव्हानं येऊ देत, त्यांची तमा करायची नाही, अशी हिंमत बाळगुया. लाडक्या गणरायाचं स्वागत करताना, महाराष्ट्राच्या विकासाचा पुनश्च: श्रीगणेशा करण्याचा संकल्प पूर्णत्वास जावा यासाठी गणरायाला साकडं घालतो असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

बाप्पांचा उत्सव 'हजार कोटींचा'
कोरोनाच्या दोन वर्षांच्या निर्बंधानंतर यंदाचा उत्सव निर्बंधमुक्त साजरा होत असल्याने यंदाच्या गणेशोत्सवात किमान हजार कोटींची उलाढाल होईल, असे जाणकार सांगत आहेत. यात मूर्ती ते मांडव आणि पूजा ते विसर्जन मिरवणूक अशा १० दिवसांच्या खर्चाचा समावेश आहे. राज्य सरकारने घेतलेला निर्बंधमुक्त उत्सवाचा निर्णय आणि आगामी महापालिकेची निवडणूक विचारात घेऊन ‘होऊ द्या खर्च’ म्हणत इच्छुकांनी घेतलेली उत्सवातील उडी यामुळे बाजारपेठेत नवचैतन्य संचारले आहे. सार्वजनिक मंडळांपासून ते घरगुती गणेशस्थापना करणाऱ्यांपर्यंत प्रत्येक जण यंदाचा उत्सव जल्लोषात साजरा करण्यासाठी सरसावला आहे.

कौटुंबिक गणेशासाठीही १ ते १० हजार रुपयांपर्यंतचा खर्च
घरगुती स्वरूपातील गणेश प्रतिष्ठापना घराच्या रंगरंगोटीपासून सुरू होते. त्या खर्चापासून ते पाचव्या, सातव्या किंवा दहाव्या दिवशी गणेश विसर्जन करेपर्यंत प्रत्येक कुटुंबाचा १ हजार रुपयांपासून ते किमान १० हजार रुपयांपर्यंत खर्च होतोच. घरगुती स्वरूपात बसवण्यात येणाऱ्या मखरांचीच किंमत आता २ हजार रुपयांपासून पुढे आहे. कागदी फुलांच्या सजावटीची मोठी मखरे तर ५ ते १५ हजार रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत व त्याला मागणीही फार मोठी आहे. त्याशिवाय अनेक मोठी कुटुंबे घरातच देखणी सजावट करतात. मुलांची हौस, कुटुंबाची परंपरा अशा काही कारणांनी त्यांच्याकडे खर्चाची मर्यादा नसते.

Web Title: Greetings from Chief Minister Eknath Shinde to the citizens of Ganeshotsav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.