माणुसकीची भिंत ठरतेय गोरगरिबांसाठी आधारवड
By Admin | Published: October 21, 2016 08:52 AM2016-10-21T08:52:13+5:302016-10-21T08:54:59+5:30
नागपूरमधील राजेश दुरुगकर नावाच्या व्यक्तीने सुरू केलेली ‘माणुसकीची भिंत’ या गोरगरिबांसाठी खरोखरच एक आधारवड ठरत आहे.
थंडीत कुडकुडणाऱ्यांसाठी कपड्यांची मदत
दयानंद पाईकराव , ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. २१ - समाजात एक वर्ग असा आहे की त्याच्याजवळ अमाप संपत्ती, ऐषोआरामाच्या वस्तू मुबलक आहेत. परंतु नाण्याची दुसरी बाजू म्हणजे दोन वेळचे जेवण अन् अंग झाकण्यासाठी पुरेसे कपडेही नसलेले गरीब लोक. समाजातील हे भीषण वास्तव पाहून राजेश दुरुगकर नावाच्या व्यक्तीने सुरू केलेली ‘माणुसकीची भिंत’ या गोरगरिबांसाठी खरोखरच एक आधारवड ठरत आहे.
राजेश दुरुगकर हे भारत पेट्रोलियममधून अधिकारी पदावरून निवृत्त झालेले व्यक्ती. त्यांनीच समाजातील भीषण दारिद्र्य पाहून माणुसकीची भिंत हा उपक्रम अॅक्शन ग्रुपच्या माध्यमातून शंकरनगर चौकात सुरू केला. शंकरनगर चौकातील भिंतीवर त्यांनी ४० खिळे ठोकले आहेत. यात वापरलेले कपडे दात्यांनी आणून या खिळ्यावर अडकवून निघून जावे अन् ज्यांना खरोखरच घालण्यासाठी कपडे नाहीत, अशा गरीब, गरजूंनी हे कपडे काढून ते वापरावेत अशी या उपक्रमामागील संकल्पना आहे. पहिल्याच दिवशी या उपक्रमाला नागपूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत जवळपास ५०० कपडे या माणुसकीच्या भिंतीवर आणून लावले. यात जुने चप्पल, जोडे, चादर, पुस्तके, अंगात घालावयाचे कपडे यांचा समावेश आहे. थंडीच्या दिवसात अनेकांना या उपक्रमामुळे अंगावर घेण्यासाठी चादर आणि कपड्यांची मोलाची मदत झाली आहे. नागपुरातील सर्व भागातील गरिबांना कपडे मिळावेत यासाठी हा उपक्रम लवकरच बजाजनगर, सदर, सीताबर्डी, लॉ कॉलेज चौक येथे सुरू करणार असल्याचे राजेश दुरुगकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. माणुसकीची भिंत या उपक्रमाव्यतिरिक्त गोरगरीब मुलांना शिक्षणासाठी मदत, गरजूंना औषधी वितरण, आजारी असलेल्या मोकाट जनावरांची काळजी घेणे हे कार्यही ते मागील सात वर्षांपासून करीत आहेत. नागपूरव्यतिरिक्त मुंबईत नेरुळ आणि वाशीलाही त्यांनी हा उपक्रम सुरू केला असून या उपक्रमाला समाजातील दात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
अमेरिकेत गेल्यानंतर सुचली कल्पना
राजेश दुरुगकर हे अमेरिकेत गेले होते. तेथे त्यांना एका भिंतीवर कपडे अडकविलेले आढळले. उत्सुकतेपोटी त्यांनी हे कपडे कशासाठी लटकविले आहेत याची विचारणा केली. त्यावर त्यांना हे कपडे गोरगरीब नागरिकांसाठी ठेवण्यात आल्याची माहिती मिळाली. भारतातील दारिद्र्य आणि गरजूंसाठी हा उपक्रम राबविण्याचा विचार त्यांच्या मनात आला आणि लगेचच त्यांनी आपल्या मनातील विचार कृतीत उतरवून माणुसकीची भिंती उभी केली.