भूजल शोषितांना ‘जलधर’ची साथ
By admin | Published: October 26, 2016 02:52 AM2016-10-26T02:52:19+5:302016-10-26T02:52:19+5:30
भूजलाचा अतिउपसा होणाऱ्या, तसेच उन्हाळ््यात पाण्याची टंचाई जाणवणाऱ्या गावात जलव्यवस्थापन करण्यासाठी जलधर भूजल व्यवस्थापन संघाची स्थापना करण्यात येणार आहे.
- विशाल शिर्के, पुणे
भूजलाचा अतिउपसा होणाऱ्या, तसेच उन्हाळ््यात पाण्याची टंचाई जाणवणाऱ्या गावात जलव्यवस्थापन करण्यासाठी जलधर भूजल व्यवस्थापन संघाची स्थापना करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात पुण्यासह राज्यातील सात जिल्ह्यातील २७० गावांची निवड करण्यात आली असून, जानेवारीपासून या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
भूजल व्यवस्थापन लोकसहभागातून करण्याचा निर्णय राज्य सरकारने हाती घेतला आहे. त्या नुसार प्रत्येक गावात जलधर भूजल व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात येणार असून, त्याची धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी करण्यात येणार आहे.
समितीच्या माध्यमातून गावात पडणारा पाऊस, सध्याचा भूजल वापर याचा आढावा घेण्यात येणार आहे. पडणाऱ्या पावसाच्या प्रमाणात पाण्याचा वापर किती होतो याचा आढावा घेऊन भूजलाची तूट आहे की नाही हे समिती ठरवेल. तूट आढळल्यास तसा अहवाल जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यास पाठविण्यात येईल. त्यानुसार जलपुनर्भरणाची योजना राबविण्यात येणार आहे. या समितीच्या माध्यमातून संबंधित गावाचा जलधर (पाणी धरुन ठेवणारा भाग) निश्चित करण्यात येणार आहे. तसेच पाणी उपलब्धतेवरुन कोणती पिकपद्धती अधिक किफायतशीर ठरेल, पिकांना पाणी देण्याची पद्धत कोणती असावी, याबाबतही समितीच्या माध्यमातून मार्गदर्शन केले जाईल. त्यासाठी संबंधित गावात उभारलेल्या रेन गेजमधून पाऊस कसा मोजायचा, निरीक्षण विहिरींची पातळी कशी तपासायची याचे प्रशिक्षण देखील संबंधितांना दिले जाईल, अशी माहिती भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे संचालक सुनील पाटील यांनी दिली.
जानेवारीपासून याची माहिती संकलित करण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे गावाचा जलनकाशा तयार होणार आहे. आत्तापर्यंत २७० पैकी १०८ गावांचे सखोल भू-जल सर्वेक्षण झाले असून, त्या गावांचा नकाशा देखील तयार झाला आहे. ही सर्व माहिती नकाशासह भूजल विभागाच्या संकेतस्थळावर देण्यात येणार आहे.
अशी असेल समिती
गावाच्या नावाने जलधर भूजल व्यवस्थापन संघाची नोंद चॅरिटी कमिश्नरकडे होईल. या संघाचा अध्यक्ष पंचायत समिती सदस्य असेल. तर गट विकास अधिकारी पदसिद्ध सचिव असतील. त्यात पाणी तज्ज्ञ, गावातील प्रतिनिधी, सिंचन, कृषी, पाणी पुरवठा, भूजल सर्वेक्षण, सर्कल या सदस्यांचा समावेश समितीत असेल.
या योजनेंतर्गत जानेवारीपासून याची माहिती संकलित करण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे गावाचा जलनकाशा तयार होणार आहे.
जलधर योजनेतील
जिल्हानिहाय गावे
जिल्हागावे
नगर ६५
जळगाव ३३
अमरावती ४९
बुलडाणा ३९
सातारा १३
औरंगाबाद १९
पुणे ५२