पावसाळ्यातच खालावली भूजल पातळी
By Admin | Published: August 11, 2014 12:48 AM2014-08-11T00:48:40+5:302014-08-11T00:48:40+5:30
हमखास पावसाचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या यवतमाळमध्ये वार्षिक सरासरीच्या केवळ ३३ टक्के पाऊस झाला असून त्याचा परिणाम भूजल पातळीवर होत आहे. दरवर्षी आॅगस्ट महिन्यात
दुष्काळाची चाहूल : वार्षिक सरासरीच्या केवळ ३३ टक्के पाऊस
ज्ञानेश्वर मुंदे - यवतमाळ
हमखास पावसाचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या यवतमाळमध्ये वार्षिक सरासरीच्या केवळ ३३ टक्के पाऊस झाला असून त्याचा परिणाम भूजल पातळीवर होत आहे. दरवर्षी आॅगस्ट महिन्यात वाढणारी भूजल पातळी यंदा मात्र घटत असल्याचे दिसत आहे. भूजल सर्वेक्षण विभागाने केलेल्या पाहणीत जिल्ह्यातील आठ तालुक्यांंची भूजल पातळी ०.६८ ते ०.१६ मीटरने खालावली आहे.
यवतमाळ हा हमखास पावसाचा जिल्हा आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी ९११.३४ मिमी आहे. १ जून ते १० आॅगस्टपर्यंत ५१२ मिमी पाऊस अपेक्षित असतो. मात्र यंदा पावसाने जिल्ह्यावर अवकृपा केली आहे. १ जून ते १० आॅगस्टपर्यंत ३०३.०२ मिमी पावसाची नोंद झाली. हा पाऊस वार्षिक सरासरीच्या केवळ ३३.३० टक्के आहे. परिणामी भूगर्भातील पाण्याची पातळी खालावत चालली आहे. गतवर्षी वार्षिक सरासरीच्या दीडशे टक्के पाऊस झाला होता. त्यामुळे मे महिन्यात १.७५ मीटर भूजल पातळी होती. परंतु आता ही पातळी खालावत असल्याचे दिसून येते. भूजल सर्वेक्षण विभागाच्यावतीने दरवर्षी मे महिन्यात भूजल पातळी तपासण्यात येते. मात्र यावर्षी दुष्काळ सदृश परिस्थिती असल्याने शासनाच्या निर्देशानुसार जुलै महिन्यात ही पाहणी करण्यात आली. त्यावेळी धक्कादायक बाब समोर आली. यवतमाळ, दारव्हा, दिग्रस, घाटंजी, महागाव, पुसद, उमरखेड, दारव्हा आणि बाभूळगाव या तालुक्यात भूजल पातळी खालावल्याचे दिसून येते. दारव्हा तालुक्यात सर्वाधिक ०.६८ मीटरने पातळी खालावली आहे. तर महागाव ०.४१, पुसद ०.३६ मीटर अशी पातळी खालावली आहे.
विशेष हे कीे, या तालुक्यात वार्षिक सरासरीच्या केवळ २५ टक्के पाऊस झाला. त्यामुळेच भूगर्भातील पाण्याची पातळीच वाढली नाही. जिल्ह्यावर दुष्काळाची गडद छाया दिसत आहे. अद्यापही तालुक्यातील पैनगंगा, पूस, वर्धा, अडाण या नद्यांचे पात्र कोरडे आहे.