पारनेरमध्ये भूगर्भातून आवाज !
By Admin | Published: June 1, 2016 10:31 PM2016-06-01T22:31:03+5:302016-06-01T22:50:02+5:30
पारनेर तालुक्यातील अहमदनगर-कल्याण राष्ट्रीय महामार्गापासून तीन किलोमीटर अंतरावरील ढोकी शिवारात बुधवारी दुपारी जमिनीतून मोठे आवाज आले.
ऑनलाइन लोकमत
टाकळी ढोकेश्वर (अहमदनगर), दि. १ - पारनेर तालुक्यातील अहमदनगर-कल्याण राष्ट्रीय महामार्गापासून तीन किलोमीटर अंतरावरील ढोकी शिवारात बुधवारी दुपारी जमिनीतून मोठे आवाज आले. त्यानंतर काही वेळातच डांबरासारखा काळा द्रव बाहेर आला. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
भुसारी वस्तीनजीक असणाऱ्या भाऊसाहेब गोविंद बरकडे यांच्या गट क्र. ११७ या भूखंडामध्ये हे आवाज आल्यानंतर येथील छबुलाल खान यांनी जवळ येवून पाहिले असता धूर, ज्वाला जमिनीतून निघत होत्या. याबरोबरच लाव्हारसासारखा काळा द्रव बाहेर पडला होता. काही वेळातच हे पाहण्यासाठी परिसरात मोठी गर्दी झाली. ही घटना नेमकी कशामुळे घडली, याचा शोध घेण्याचे काम सुरू होते.
दहा वर्षांपूर्वी अचानक डोंगरात स्फोट होऊन १२ फुटाचा खड्डा पडल्याची घटना गारखंडी येथे घडली होती. तसेच मागील महिन्यात धोत्रे येथे जमिनीला भेग पडून एका विहिरीचे पाणी गायब होऊन ते दोन किलोमीटर अंतरावरील कूपनलिकेवाटे पाणी वाहत होते. याबाबतही स्थानिकांमध्ये कुतुहल निर्माण झाले होते.