सोशल मीडियावर सत्ताधाऱ्यांची टोळी

By Admin | Published: May 5, 2016 04:52 AM2016-05-05T04:52:14+5:302016-05-05T04:52:14+5:30

सध्या सत्ताधाऱ्यांच्या प्रेमात बुडालेल्यांची एक नवीन टोळी उदयास आली आहे. त्यांना मी ‘नवसंघीष्ट’ असे नाव दिले आहे. ही टोळी सोशल मीडियावर कार्यरत आहे. कोणी मोदी सरकारवर टीका केली

The group of ruling on social media | सोशल मीडियावर सत्ताधाऱ्यांची टोळी

सोशल मीडियावर सत्ताधाऱ्यांची टोळी

googlenewsNext

राज ठाकरे : व्यंगचित्रकाराच्या नजरेतून टिपले राजकीय वास्तव

सध्या सत्ताधाऱ्यांच्या प्रेमात बुडालेल्यांची एक नवीन टोळी उदयास आली आहे. त्यांना मी ‘नवसंघीष्ट’ असे नाव दिले आहे. ही टोळी सोशल मीडियावर कार्यरत आहे. कोणी मोदी सरकारवर टीका केली की, ही टोळी त्यांच्यावर तुटून पडते. शिवाय, भाजपाचा सोशल मीडिया सेल चांगलाच कार्यरत आहे. आतापर्यंत सोशल मीडियावर केवळ भाजपा कार्यरत होते, पण आता विरोधकांनीही हे तंत्र अवलंबल्याने सोशल मीडियावरील मोदी समर्थकांच्या मक्तेदारीला आव्हान मिळाले आहे. त्यामुळे आता मोदीविरोधी प्रचारही सोशल मीडियावरून सुरू झाला आहे, पण मला सोशल मीडियावर राहायला व त्या माध्यमातून प्रचारतंत्र राबवायला आवडत नाही. त्याला ना आई ना बाप. कोणीही उठतो व काहीही बोलत असतो. त्याला किती महत्त्व देणार. काही लोक फेसबुकवर लेख लिहितात व नंतर त्याला किती लाइक मिळाले हे पाहात बसतात. सोशल मीडियाकडे पाहून काय लिहायचे, कसे व्यक्त व्हायचे हे ठरवू नये. तुम्हाला जे वाटते ते लिहा. प्रतिक्रियांची चिंता करत बसू नका.
माझ्यापुरताही मी हाच निर्णय घेतला आहे. मला जेव्हा बोलावेसे वाटेल, तेव्हाच मी बोलणार, उगाच ऊठसूठ टिवटिव करणे मला पसंत नाही. अर्थात, सोशल मीडियावरील प्रचारतंत्र सध्या वापरत नसलो, तरी या तंत्राचा प्रभावी वापर मला २००८ मध्ये अटक झाला, तेव्हा मनसेने तो प्रथम केला होता. भाषणांची क्लिप सर्वत्र मोबाइलवर फिरली. वातावरण निर्मिती झाली. त्या वेळी सगळ््यांना या माध्यमाची ताकद कळली व २०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांनी या माध्यमाचा खुबीने वापर केला.
नरेंद्र मोदी यांच्या २०१४ मधील विजयात सोशल मीडियाचा मोठा वाटा आहे, हा समज चुकीचा आहे. खरे तर राहुल गांधी यांचा वाटा ५० टक्क्यांपेक्षा जास्त होता. प्रतिस्पर्धी म्हणून मोदींच्या तुलनेत राहुल गांधी कोठेच नव्हते. राहुल यांच्या उमेदवारीमुळे मोदींचे काम सोपे झाले. आता मोदींबाबत मी भूमिका बदलतो असे म्हणतात, पण चांगल्या गोष्टीला चांगले म्हणणे आणि वाईट घडले की वाईट म्हणणे हे स्वाभाविकच ना. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत माझी नेमकी हीच भूमिका आहे.

हे आवडते चेहरे...
आजकालचा विचार करता रा. स्व. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, भाजपा नेत्या सुषमा स्वराज, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्यंगचित्राचे विषय म्हणून अधिक आकर्षित करतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्यापेक्षा त्यांची शरीरयष्टी व्यंगचित्र रेखाटण्यासाठी चित्रकारांना जास्त सोयीची आहे.

इंदिरा गांधी यांचे पहिले व्यंगचित्र ...
इंदिरा गांधी या लालबहादूर शास्त्री यांच्या मंत्रिमंडळात नभोवाणी मंत्री झाल्या. त्या वेळी त्यांच्यावर व्यंगचित्रे काढणे सुरू झाले. एका व्यंगचित्रकाराने ट्रान्झिस्टरचे चित्र काढले आणि अँटेनाच्या तोंडावर इंदिरा गांधींचा चेहरा काढला. खाली फक्त इंदिरा गांधी नभोवाणी मंत्री एवढेच लिहिले, ते चित्र खूप गाजले.

मी कुशाभाऊ ठाकऱ्यांंपैकी नाही!
राज ठाकरे यांच्या सहीतला ठाकरे या शब्दातली वळणं बाळासाहेबांची आठवण करून देतात, त्यांचीही सहीतली वळणं अशीच असायची असं सांगितल्यावर... राज यांनी मी बाळासाहेब ठाकऱ्यांपैकी, कुशाभाऊ ठाकऱ्यांपैकी नाही, अशी मिश्कील टिप्पणी केली.

प्रमोद महाजनांचे व्यंगचित्र...
प्रमोद महाजन यांनी कधीही संघाची हाफपँट घातली नाही, त्यांना तसे कोणी पाहिले नाही, पण मी संघाच्या गणवेशातील महाजन यांचे व्यंगचित्र काढून त्यांना दिले होते. त्यांना ते खूप आवडले व दिल्लीतील घरात त्यांनी ते लावले होते.

माझी शैली : माझी व्यंगचित्र काढण्याची पद्धत जुनी आहे, मी खाली बसून, मांडी घालून चित्र काढतो, उभे राहून बोर्डवर चित्र काढणे मला जमत नाही. चित्रात व्यक्तिरेखा किती, पार्श्वभूमी काय, किती तपशील आहेत, यावर किती वेळ लागेल हे अवलंबून असते. साधारणपणे चार ते पास तास तरी लागतात.

मी सुरुवातीच्या काळात व्यंगचित्रकार व्हायचे ठरवले होते. यातच करिअर करायचे, अशी प्रबळ इच्छाही होती. त्या कॉलेजच़्या दिवसात दहा-दहा तास सराव करायचो. त्या दिवसांत मी रवी परांजपे यांच्याकडेही जात होतो. त्यांनी मला वास्तववादी चित्रकलेचे धडे दिले. जे समोर दिसेल ते काढ, असे ते सांगायचे. त्यानुसार, खूप चित्रे काढली. त्याचा व्यंगचित्रे काढताना मोठा फायदा झाला.

मी एक व्यंगचित्र काढले होते. राजीव गांधी हे इंदिरानिष्ठांना हळूहळू दूर सारत होते. त्यावर राजीव आणि इंदिरा यांच्या नाकांची मी फुली काढली व त्याला निष्ठांची फुली असे नाव दिले होते. राजकीय वाचन आणि अवांतर वाचन हे दोन्ही चांगले असेल, तर व्यंगचित्र प्रभावी होते. झिया उल हक यांचा मृत्यूनंतर एक व्यंगचित्र आले होते. त्यात झिया स्वर्गात गेल्यावर भुत्तो हे त्यांचे स्वागत करताना, या .. कधीपासून तुमची वाट पाहात होतो, असे म्हणताना दिसतात!

बाळासाहेबच सर्वश्रेष्ठ व्यंगचित्रकार...
देशातील व्यंगचित्रकारांबाबत बोलायचे तर खूप जबाबदारीने सांगतो, बाळासाहेब ठाकरे हेच भारतातले आत्तापर्यंतचे सर्वोत्कृष्ट व्यंगचित्रकार आहेत. आर. के. लक्ष्मण हे नि:संशय थोर व्यंगचित्रकार होते. मात्र, लक्ष्मण यांचा विनोद हा हसून बाजूला ठेवला जाण्याची शक्यता होती, तर बाळासाहेबांची व्यंगचित्रे विचार करायला भाग पाडायची आणि ती स्वभावत: तिखट होती.
बाळासाहेबांची रेखाटने, त्यातील भाष्य यांचा विचार करता, त्या दर्जाचे अजूनही कोणी व्यंगचित्रकार दिसत नाहीत. स्वभावाचाही चित्रावर परिणाम होतो. माझे वडील चित्र काढायचे, पण मुळात त्यांचा संगीताकडे ओढा असल्याने त्यांची रेषा बारीक आणि नाजूक असायची, तर बाळासाहेबांचा स्ट्रोक हा बोल्ड होता. व्यंगचित्रकार होण्यासाठी उपजत दृष्टी असायला हवी, हेच खरे.

Web Title: The group of ruling on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.