कृषीकर्ज १५ हजार कोटींनी वाढवा
By admin | Published: May 8, 2016 02:09 AM2016-05-08T02:09:58+5:302016-05-08T02:09:58+5:30
महाराष्ट्रात एक कोटी ३६ हजार खातेधारक शेतकरी असून त्यातील ५८ लाख शेतकरी कर्ज घेतात. उर्वरित शेतकरी सावकार किंवा मग इतर स्त्रोतांकडून कर्ज घेतात. हे लोक कृषीपत
नवी दिल्ली : महाराष्ट्रात एक कोटी ३६ हजार खातेधारक शेतकरी असून त्यातील ५८ लाख शेतकरी कर्ज घेतात. उर्वरित शेतकरी सावकार किंवा मग इतर स्त्रोतांकडून कर्ज घेतात. हे लोक कृषीपत पुरवठ्याला वंचित आहेत. त्यामुळे किमान २० लाख शेतकऱ्यांना कृषीकर्ज प्रणालीत आणण्यासाठी कृषीकर्जाची १५ हजार कोटी रूपयांनी वाढविण्याची मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिली. २०१२ पासून २०१४ पर्यंत चार कोटी ४२ लाख शेतकऱ्यांच्या थकित कर्जाची पाच वर्षांसाठी पुनर्रचना करण्याची आमची मागणी असल्याचे ते म्हणाले.
विमा योजना : पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत यंदा एक कोटी १३ लाख शेतकऱ्यांनी विमा काढला आहे. गेल्यावर्षी ही संख्या केवळ १७ लाख होती. ही संख्या वीमा कवच लाभलेल्या देशातील एकूण पीकाच्या २७ टक्के आहे.
गोसीखुर्द प्रकल्प
मुख्यमंत्री म्हणाले की, ३० वर्षांपासून प्रलंबित असलेल्या गोसीखुर्द प्रकल्पासाठी आम्ही केंद्राकडे ९० : १० या प्रमाणात निधी मागितला आहे. केंद्राने ९०टक्के निधी देण्याचे आश्वासन दिले आहे.
पंतप्रधानांकडून विलंब नाही
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशा प्रकारची बैठक घेण्यास विलंब केला काय या प्रश्नावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, त्यांनी योग्यवेळी बैठक आयोजित करून स्थितीचा आढावा घेतला. लातूरमध्ये पाणिवाटपात गडबड होत मान्य करताना यात लवकरच सुधारणा केली जाईल, असे ते म्हणाले.
४००० गावांसाठी योजना
मराठवाडा आणि विदर्भातील ४००० गावांसाठी सिंचन योजना तयार करण्यात आली असून यासाठी जागतिक बँकेकडे कर्ज मागण्यात येईल.
यासंदर्भात केंद्रीय वित्त विभागाने ही योजना मंजूर करून बँकेकडून कर्ज मिळविण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
दुष्काळग्रस्त गावे
विदर्भ : १३,८१७
मराठवाडा : ८,५२२
उ. महाराष्ट्र : ४,८९६
प. महाराष्ट्र : १,४२७
एकूण : २८,२६२