सामान्यांपर्यंत विकास पोहोचवा
By admin | Published: May 30, 2016 01:51 AM2016-05-30T01:51:53+5:302016-05-30T01:51:53+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दमदार नेतृत्वाने संपूर्ण देशाच्या विकासात केवळ दोन वर्षांत आघाडी घेतली आहे
तळेगाव दाभाडे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दमदार नेतृत्वाने संपूर्ण देशाच्या विकासात केवळ दोन वर्षांत आघाडी घेतली आहे. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवताना विकासाची गंगा शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे रविवारी केले.
भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या जिल्हा मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार संजय भेगडे होते. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आमदार भेगडे यांच्या दीड वर्षाच्या कार्यपूर्ती अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. व्यासपीठावर पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अमर साबळे, आमदार लक्ष्मण जगताप, बाबूराव पाचर्णे, ज्येष्ठ नेते केशवराव वाडेकर, माजी आमदार दिगंबर भेगडे, पुणे शहराध्यक्ष योगेश गोगावले, तात्याराव गावडे, सचिन पटवर्धन, दिलीप खैरे, भास्कर म्हाळस्कर, ज्योती जाधव, उमा खापरे आदी उपस्थित होते. दुष्काळग्रस्तांना मदतीसाठी तालुका भाजपातर्फे ११ लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीसाठी फडणवीस यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला.
मेक इन इंडिया, स्वच्छता अभियान सारख्या महत्त्वाकांक्षी योजनांमुळे विकासाची घोडदौड सुरू आहे. त्यावर टीका करणाऱ्यांनी गेल्या ५० वर्षांत स्वार्थच पाहिला, असे सांगताना मुख्यमंत्र्यांनी आमच्याकडे एक बोट दाखवणाऱ्यांनी त्यांची चार बोटे स्वत:कडे असल्याचे विसरू नये, अशी टीकाही कॉंग्रेस व राष्ट्रवादीचे नाव न घेता केली.
स्वागत शहराध्यक्ष संतोष दाभाडे-पाटील यांनी, सूत्रसंचालन नगरसेवक गणेश भेगडे यांनी व तालुकाध्यक्ष प्रशांत ढोरे यांनी
आभार मानले.(वार्ताहर)
भाजपात प्रवेश केलेल्या विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांचा सत्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. त्यात शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख भाई भरत मोरे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मिलिंद बोत्रे, पुणे महानगर नियोजन समितीचे सदस्य संदीप काशीद-पाटील, विलास कुटे, शरद कुटे, दत्तात्रय पानसरे, महेश पानसरे, रोहिदास असवले, अजित गाडे, आळंदीचे माजी नगराध्यक्ष विलास कुऱ्हाडे, वर्षा कोदरे, उपनगराध्यक्ष वासुदेव घुंडरे, घोडगंगा कारखान्याचे माजी उपाध्यक्ष दादापाटील फराटे, बाजार समिती संचालिका सुरेखा भोसले, मीनाक्षी फराटे, आत्माराम फराटे, गोविंद फराटे, महादेव फराटे, राजाराम शितोळे, पंचायत समिती सदस्य लक्ष्मण फराटे, सरपंच सुवर्णा फराटे, उपसरपंच अशोक फराटे, बाळकाका फराटे, गणेश ओव्हाळ, विशाल कलाटे यांच्यासह कार्यकत्यांनी भाजपात प्रवेश केला.
स्वच्छता अभियानात पाच हजार गावे व ५० शहरे हगणदारीमुक्त झाली आहेत. टीका करणाऱ्यांना जे ५० वर्षांत करता आले नाही, ते आम्ही केवळ एका वर्षात केले आहे, असे स्पष्ट करताना त्यांनी मावळचा विशेष उल्लेख करून उद्योग उभारणीसाठी गुंतवणूकदारांकडून पुणे जिल्ह्याला पहिली पसंती मिळत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आमदार भेगडे म्हणाले, ‘‘घड्याळमुक्त पुणे जिल्हा करण्याचा आम्ही निर्धार केला आहे. दीड वर्षात दीडशे कोटीची विकासकामे झाली. पूर्वी मावळच्या विकासकामांना नकारघंटा मिळे. आता मुख्यमंत्री फडणवीस यांनी विकासाच्या प्रत्येक प्रस्तावाला मदत दिली आहे.’’