सुरक्षित अन्नधान्य निर्मितीसाठी ‘ग्रो सेफ फूड’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2016 02:40 AM2016-10-17T02:40:13+5:302016-10-17T02:40:13+5:30
केंद्रीय कृषी मंत्रालयाचे देशभर अभियान.
अकोला, दि. १६- अलीकडच्या काही वर्षांत पीक उत्पादनावर वाढलेल्या कीटकनाशकांचे प्रमाण बघता केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे देशात ह्यग्रो सेफ फुडह्ण अभियान राबविण्यात येत आहे; पण आजही एका पिकासाठी निर्माण करण्यात आलेले कीटकनाशक दुसर्या पिकावर वापर होत असल्याने मानवी आरोग्याला धोका वाढला असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मानवी आरोग्याला घातक असलेल्या अशा कीटकनाशकांवर प्रतिबंध घालणे गरजेचे झाले आहे.
देशात हजारो कीटकनाशक कंपन्या असून, या सर्व कंपन्यांना कीटकनाशके तयार करण्यासाठी परवाना घ्यावा लागतो, (कीटकनाशक, बुरशीनाशक व तणनाशके) कीटकनाशक निर्मितीनंतर त्याच्या चाचण्या घेतल्या जातात. मानवी सुरक्षा व सावधानीपूर्वक मूल्यमापन चाचण्यानंतरच केंद्रीय कीटकनाशक मंडळ व नोंदणी समितीद्वारे विशिष्ट उपयोगासाठी नोंदणी व परवाना दिला जातो. निर्मित कीटकनाशकांचा साठा व विक्री करताना मात्र विक्रेते व घाऊक व्यापार्यांनी नोंदणीचे नियम व शर्तीनुसारच विक्री करण्याची गरज आहे; पण तसे न करता अनेक ठिकाणी एकाच पिकावर वापरण्याची परवानगी असलेले कीटकनाशक सर्रास सर्वच पिकांवर वापरले जात असल्याचे धक्कादायक वृत्त आहे. केंद्रीय कीटकनाशक मंडळाने कापूस या पिकासाठी कीटकनाशकांना परवानगी दिली असते; पण तेच कीटकनाशक सर्रासपणे मूग, तूर किंवा इतर पिकांवर वापरण्याची शिफारस विक्रेते शेतकर्यांना करीत असतात. परिणामी, चुकीचे कीटकनाशक वापरल्याने त्याचा मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. कीटकनाशके लेबल क्लेमची व्यवस्था आहे; पण शेतकर्यांमध्ये याबाबत जनजागृतीची गरज आहे.
कीटकनाशक विक्रेत्यांनी निकृष्ट, नकली आणि कमी दर्जाच्या कीटकनाशकांची विक्री, वितरण तसेच साठवणूक करणे हा कीटकनाशक अधिनियम १९६८ नुसार एक गंभीर अपराध आहे. असे करणार्यांवर दंडात्मक कारवाई होते; परंतु अनेक ठिकाणी या अधिनियमांना डावलून सर्रास कीटकनाशके विकली जात असल्याचे वृत्त आहे.
- कापसावरील कीटकनाशके कापसावरच फवारणे गरजेचे आहे; परंतु तीच कीटकनाशके इतर पिकांवर वापरले जात असल्याने मानवी आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. दिल्लीतील एका सामाजिक संघटनेने भाजीपाला पिकावरील विषापेक्षा अधिक आढळलेले कीटकनाशकांचे प्रमाण अधोरेखित करते. त्यामुळे शेतकर्यांनीदेखील काळजी घेणे गरजेचे आहे.
डॉ. एन. एम. काळे,
विस्तार शिक्षण विभाग,
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.