पाचव्या सप्ताहातही वाढ सुरूच; सेन्सेक्स झाला ३७ हजारांच्या पार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2020 10:12 PM2020-07-19T22:12:06+5:302020-07-19T22:12:30+5:30
गतसप्ताहाचा प्रारंभ मुंबई शेअर बाजारामध्ये वाढीव पातळीवर झाला
माहिती तंत्रज्ञान कंपन्यांचे अपेक्षेहून चांगले आलेले तिमाही निकाल, चीनच्या अर्थव्यवस्थेमध्ये होऊ लागलेली वाढ, भारताच्या चालू खात्यावर यंदा शिल्लक रक्कम राहण्याचा अंदाज अशा सकारात्मक बाबींमुळे परकीय वित्तसंस्था आणि देशांतर्गत वित्तसंस्थांनी विक्री करूनही बाजार वाढीव पातळीवर बंद झाला. सलग पाचव्या सप्ताहामध्ये निर्देशांक वाढीव पातळीवर बंद झाले.
गतसप्ताहाचा प्रारंभ मुंबई शेअर बाजारामध्ये वाढीव पातळीवर झाला. सप्ताहामध्ये संवेदनशील निर्देशांक ३७,१२५.९८ ते ३५,८७७.४२ अंशांदरम्यान हेलकावे घेताना दिसून आला. सप्ताहाच्या अखेरीस हा निर्देशांक ३७ हजारांची पातळी ओलांडून पुढे गेल्याने गुंतवणूकदारांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले. राष्टÑीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी)सुद्धा १०,९०० अंशांच्या वर गेला आहे.
आगामी काळामध्ये भारतीय अर्थव्यवस्था ९.५ टक्क्यांनी आक्रसणार असल्याच्या नव्या अंदाजाने बाजारात काही प्रमाणात निराशा निर्माण झाली आहे, मात्र खनिज तेल तसेच सोन्याची कमी होत असलेली आयात त्याचप्रमाणे चीनकडून होणाऱ्या आयातीमध्ये झालेली कपात यामुळे यंदा चालू खात्यावरील तूट नष्ट होणार असून, हे खाते शिलकीत राहण्याचा अंदाज मनोबल वाढविणारा आहे.