रुग्णवाढीचा दर ७ वरून ४.१५ टक्क्यांवर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2020 05:42 AM2020-06-04T05:42:31+5:302020-06-04T05:42:43+5:30
राज्यात कोरोनाचे ७४,८६० रुग्ण : आतापर्यंत २,५८७ बळी; दिवसभरात २ हजार ५६० रुग्ण, तर १२२ मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात १ मे ते १ जून कालावधीत राज्यातील रुग्णवाढीचा वेग क्रमश: कमी होत असून १ जून रोजी तो देशाच्या सरासरीपेक्षा ४.७४ टक्केदेखील कमी झालेला आहे, हे स्पष्ट झाले आहे. यावरून राज्यातील कोविड-१९ प्रसाराचा वेग मंदावत असल्याचे स्पष्ट होत आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, आता राज्यात रुग्णवाढीचा दर ७ वरून ४.१५ टक्क्यांवर आल्याची दिलासादायक बाब समोर आली आहे.
राज्यात बुधवारी दिवसभरात कोरोनाच्या २ हजार ५६० रुग्णांची तर १२२ मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यात ३९ हजार ९३५ अॅक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. यामुळे राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या ७४ हजार ८६० झाली असून मृतांचा आकडा २ हजार ५८७ झाले आहेत. दिवसभरात ९९६ रुग्ण बरे झाले आहेत, तर आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या ३२ हजार ३२९ आहे.
राज्यात नोंद झालेल्या १२२ मृत्यूंमध्ये मुंबई ४९, उल्हासनगर ३, नवी मुंबई ३, ठाणे २, मीरा भार्इंदर १, वसईविरार १, भिवंडी १, धुळे ४, जळगाव २, अहमदनगर १, नंदुरबार १, पुणे १९, सोलापूर १०, कोल्हापूर २, औरंगाबाद मनपा १६, जालना १, उस्मानाबाद १, अकोला २ आणि उत्तर प्रदेश, बिहार व प. बंगाल येथील प्रत्येकी एका स्थलांतरित व्यक्तीचा समावेश आहे. १२२ मृत्यूंपैकी ७१ पुरुष तर ५१ महिला आहेत. यात ६९ रुग्ण ६०पेक्षा अधिक वयोगटातील आहेत. तर ४६ रुग्ण ४० ते ५९ वयोगटातील आहेत. तर सात जण ४० वर्षांखालील आहे. या १२२ रुग्णांपैकी ८८ जणांमध्ये ७२ टक्के अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.
राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ४३.१८ टक्के आहे, तर मृत्यूदर ३.४५ टक्के आहे. सध्या राज्यात ५ लाख ७१ हजार ९१५ लोक होम क्वारंटाइनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक क्वारंटाइन सुविधांमध्ये ७१ हजार ९१२ खाटा उपलब्ध असून ३३ हजार ६७४ लोक अलगीकरणात आहेत.