शौचालय उद्दिष्टपूर्तीसाठी ग्रामसचिवांकडूनच ‘हमीपत्र’
By admin | Published: October 2, 2016 02:47 AM2016-10-02T02:47:55+5:302016-10-02T02:47:55+5:30
वाशिम जि.प. मुख्याधिका-याचा आगळा उपक्रम; कामचुकारांवर कारवाई होणार असल्याचे संकेत.
दादाराव गायकवाड
वाशिम, दि. १- स्वच्छ भारत मिशनची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी वाशिम जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी आगळावेगळा प्रयत्न केला आहे. या अभियानाबाबत जिल्ह्यातील ग्रामसेवकांच्या कामाचा व्यक्तिगत आढावा घेतला. या दरम्यान त्यांनी प्रत्येक ग्रामसचिवांकडून उर्वरित उद्दिष्ट पूर्ती करण्याचे हमीपत्रच त्यांनी प्रत्येकाकडून लिहून घेतले. उद्दिष्टपूर्ती झाली नाही, तर कोणती कारवाई करायची, हेसुद्धा त्यांनी ग्रामसचिवांकडूनच लिहून घेतले.
स्वच्छ भारत अभियान युद्धपातळीवर राबविण्यात येत आहे. राज्यभरातील जिल्हा परिषदांच्यावतीने हे अभियान आपापल्या परीने राबवित आहेत. तथापि, ग्रामस्तरावर या अभियानाच्या उद्दिष्टपूर्तीची जबाबदारी असलेले ग्रामसेवक मात्र फारसे गंभीर नसल्याचे दिसते. वाशिम जिल्ह्यातही अद्याप ३0 हजारांहून अधिक कुटुंबांकडे शौचालये नाहीत. मग जिल्हा हगणदरीमुक्त कसा करायचा, हा प्रश्न उपस्थित होतो. यात ग्रामसचिवांची महत्त्वाची भूमिका असते; परंतु वेळोवेळी बैठका घेऊन, अनेक अधिकारी, कर्मचार्यांच्या उपस्थितीत ग्रामसचिवांनी हे अभियान कसे राबविले आणि त्याच्या अडचणी काय, ते समजून घेणे आणि त्यांना सूचना करणे कठीणच असते. ही बाब लक्षात घेऊन वाशिम जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी आपल्या कार्यालयात प्रत्येक ग्रामसचिवाशी वैयक्तिक संवाद साधला आणि त्यांच्या कामाची माहिती घेतली. यावेळी अनेक ग्रामसेवकांचे काम निराशाजनक असल्याचे त्यांना दिसले. त्यामुळे शौचालयाच्या उद्दिष्टपूर्तीसंदर्भात हमीपत्र लिहून देण्याचे आदेशच त्यांनी ग्रामसचिवांना दिले. येत्या २0 ऑक्टोबरपर्यंत किती शौचालय बांधून घेणार, हे स्पष्ट करण्यासह स्वत:च ठरवून दिलेली उद्दिष्टपूर्ती निर्धारित वेळेत झाली नाही, तर कोणत्या प्रकारची कारवाई करायची हेसुद्धा त्या हमीपत्रात त्यांनी ग्रामसचिवाकडूनच नमूद करून घेतले. येत्या २0 ऑक्टोबर रोजी पुन्हा मुख्य कार्यकारी अधिकारी या ग्रामसचिवांची ह्यपेशीह्ण घेतील आणि त्यांच्या कामाचा आढावा घेऊन कारवाईची दिशा ठरवतील. यामध्ये बदलीसारख्या कारवाईसह इतर कठोर कारवाईचाही समावेश आहे.
उद्दिष्टपूर्ती न झाल्यास करा निलंबित !
मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी हमीपत्रात उद्दिष्ट आणि कारवाईचे स्वरूप ग्रामसचिवांना त्यांच्या इच्छेनेच नमूद करण्यास सांगितले. यावेळी काही ग्रामसेवकांनी उद्दिष्टपूर्तीचे आव्हान स्वीकारताना ते नियोजित वेळी पूर्ण न झाल्यास थेट निलंबित करण्याची परवानगीच हमीपत्रात लिहून दिली आहे.
शौचालयांचे उद्दिष्ट पूर्ण करणे आणि ही जबाबदारी पार पाडण्याची वृत्ती कर्मचार्यांत निर्माण करणे हा आमचा उद्देश आहे. यासाठी ग्रामसचिवांना स्वत:च लक्ष, वेळ आणि कारवाईचे स्वरूप नमूद असलेले हमीपत्र देण्याच्या सूचना केल्यात. कारवाई हा उद्देश नाही, तर त्यांनी कामाबाबत गंभीर व्हावे, हाच उद्देश आहे.
-गणेश पाटील,
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, वाशिम