पालकमंत्र्यांची मजबुतीची खेळी
By admin | Published: September 21, 2016 03:53 AM2016-09-21T03:53:35+5:302016-09-21T03:53:35+5:30
शिवसेनेचा ठाण्यातील बालेकिल्ला अभेद्य करतानाच आपला विधानसभा मतदारसंघही मजबूत करण्यात शिंदे यशस्वी झाले आहेत.
ठाणे : शिवसेनेत मंगळवारी प्रवेश करणाऱ्या चार नगरसेवकांमधील तीन नगरसेवक पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी मतदारसंघातील असल्याने शिवसेनेचा ठाण्यातील बालेकिल्ला अभेद्य करतानाच आपला विधानसभा मतदारसंघही मजबूत करण्यात शिंदे यशस्वी झाले आहेत.
ठाणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर विविध पक्षातील प्रस्थपित नगरसेवकांना आपल्याकडे खेचण्यात शिंदे यशस्वी ठरले आहेत. शिवसेनेत प्रवेश केलेल्या चारपैकी एक नगरसेवक हा ठाणे शहर मतदार संघातील आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी वेगवेगळ्या चुली मांडून आपापली ताकद अजमावून पाहिली होती. त्यावेळी दोन्ही पक्षात इनकमिंगचा सिलसिला पाहण्यास मिळाला होता. आता ठाणे महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ठाणे शहरातील फेऱ्या वाढल्या आहेत. ठाण्यात कल्याण-डोंबिवलीच्या तुलनेत भाजपाची ताकद कमी आहे. मात्र अन्य पक्षातील मातब्बर नगरसेवक गळाला लावून भाजपा वाढल्याचे चित्र निर्माण करण्याचे प्रयत्न त्या पक्षाने सुरु केले आहेत. खासदार कपिल पाटील आणि आमदार संजय केळकर यांनी त्याकरिता प्रयत्न सुरु केले आहेत. वागळे इस्टेटमध्ये अलीकडेच झालेल्या पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या अपक्ष नगरसेवक स्वाती देशमुख यांनी काँग्रेसचे माजी नगरसेवक संजय घाडीगांवकर, काँग्रेसच्याच नगरसेविका मेघना हंडोरे व त्यांचे पती यांनी भाजपात प्रवेश केला. त्यामुळे पालकमंत्र्यांनी भाजपाच्या फोडाफोडीला शह देताना कोपरी, वागळे इस्टेट आणि नौपाडा प्रभागातील चार नगरसेवकांना गळाला लावून स्वत:ची व पक्षाची ताकद वाढवली आहे.
(प्रतिनिधी)
आतापर्यंत दिव्यातील मनसेचे दोन नगरसेवक, वागळे इस्टेट येथील काँग्रेसचे सहा नगरसेवक आणि उथळसर येथील काँग्रेसचे नगरसेवक राजा गवारी यांना शिवसेनेत आणण्यात शिंदे यशस्वी ठरले आहेत.
शिवसेनेत आलेले राष्ट्रवादीचे सुभाष भोईर आणि काँग्रेसचे रवींद्र फाटक आता आमदार झाले आहेत. त्यामुळे शिवसेनेत आणलेल्यांचा फायदा होतो हा संदेश शिंदे सध्या कुंपणावरील आजी-माजी नगरसेवकांना देत आहेत.
नव्या प्रभाव रचनेनंतर नेमके चित्र स्पष्ट होईल व त्यानंतर युतीबाबतच्या संभ्रमाला पूर्णविराम मिळेल. त्यानंतर अन्य पक्षांमधील असंतुष्टांकरिता भाजपा व शिवसेनेत खेचाखेची होईल, अशी चिन्हे दिसत आहेत.