पालकमंत्री चंद्रकांतदादांना पदावरून हटवा : नीलमताई गोऱ्हे
By Admin | Published: October 28, 2015 12:12 AM2015-10-28T00:12:32+5:302015-10-28T00:18:10+5:30
कायदा आणि सुव्यवस्था चोख ठेवायची तर पोलिसांनी ही टगेगिरी थांबवावी, अशी मागणी शिवसेनेच्या उपनेत्या आमदार नीलम गोऱ्हे यांनी केली.
कोल्हापूर : भाजप, ताराराणी आघाडी, राष्ट्रवादी व कॉँग्रेस, आदी राजकीय पक्षांनी महानगरपालिका निवडणुकीत गुंड, मटका बुकीमालक, खून तसेच ‘मोक्का’तील आरोपी यांना उमेदवारी दिली आहे. या टग्यांची टगेगिरी सोमवारच्या (दि. २६) घटनेनंतर मतदारांच्या लक्षात आली असून, जर शहरातील कायदा आणि सुव्यवस्था चोख ठेवायची असेल तर पोलिसांनी ही टगेगिरी त्वरित थांबवावी, अशी मागणी शिवसेनेच्या उपनेत्या आमदार नीलम गोऱ्हे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील या घटनेचे उत्तरदायित्व घेणार नसतील तर मुख्यमंत्र्यांनी त्यांना पालकमंत्री पदावरून दूर करावे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. सोमवारी घडलेल्या घटनेची पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची काही नैतिक जबाबदारी आहे की नाही? असा सवाल करतच आमदार गोऱ्हे यांनी गुंडगिरी आणि बेबंदशाहीला पाठिंबा न देता आणि भेदभावही न करता दोषी असणाऱ्या दोन्ही गटांच्या गुंडांवर कडक कारवाई करायला पोलिसांना भाग पाडावे, अशी मागणीसुद्धा केली.
शहरात गेल्या दोन-तीन दिवसांपासून काळ्या काचा असलेली चारचाकी वाहने फिरत आहेत. मतदानाच्या दिवसापर्यंत अशा वाहनांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. ही वाहने कोणाची आहेत, त्यातून कोण फिरत आहेत, त्यांचे काय उपद्व्याप चालले आहेत, याची तपासणी व्हावी. पोलिसांनी तत्काळ अशा काळ्या काचा असलेल्या वाहनांना रोखून त्यांची कडक तपासणी करावी, काचांवरील काळ्या फिल्म काढून टाकाव्यात, अशी मागणी गोऱ्हे यांनी केली.
शहरात वाहतूक शाखेचे पोलीस आणि आचारसंहितेचे कॅमेरे कुठेच पाहायला मिळत नाहीत; त्यामुळे भाजप, ताराराणी, राष्ट्रवादीच्या गुंडांचे फावत आहे. कारागृहातून पॅरोलवर सुटलेले काही गुंड, मवाली प्रचार व पदयात्रांतून पाहायला मिळत आहेत. तेव्हा पोलिसांनी तातडीने अशा लोकांवर कारवाई करावी, असे त्या म्हणाल्या.
पैसे वाटून आणि मतदारांवर दहशत निर्माण करून कोल्हापूरची शान वाढणार नाही; तर त्यामुळे बदनामीच अधिक होणार आहे. करवीरनगरीची कायदा व सुव्यवस्था त्यामुळे बिघडणार आहे; म्हणूनच निर्भय वातावरणात निवडणूक पार पडावी आणि सामान्य नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही, याची पोलीस व निवडणूक यंत्रणेने खबरदारी घ्यावी, असे त्यांनी सांगितले.
कोणाशीही सेटलमेंट नाही
महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेने अमुक एका पक्षाबरोबर सेटलमेंट केली आहे, असा समज पसरविला जात आहे. शिवसेना एकटी लढत आहे. आम्ही कोणाशीही सेटलमेंट केलेली नाही. जी काही चर्चा आहे, ती केवळ अफवा आहे, असे स्पष्टीकरण डॉ. नीलमताई गोऱ्हे यांनी दिले. अशाच मागण्यांबाबत आमदार नीलम गोऱ्हे, आमदार राजेश क्षीरसागर, जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा, निवडणूक निर्णय अधिकारी तथा आयुक्त पी. शिवशंकर यांना भेटून चर्चा केली.
कदमवाडी राड्यातील संशयित आरोपींना दोन दिवसांत अटक केली जाईल. निवडणूक प्रक्रियेमुळे बहुतांश पोलीस बंदोबस्तात व्यस्त आहेत. संशयितांना अटक करून त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. यावेळी राड्याचे व्हिडीओ चित्रीकरण व पंचनामा सादर केला जाणार आहे.
- डॉ. मनोजकुमार शर्मा,
पोलीस अधीक्षक