डोंबिवली एमआयडीसी स्फोटाची सखोल चौकशी करणार - पालकमंत्री एकनाथ शिंदे
By admin | Published: May 26, 2016 04:51 PM2016-05-26T16:51:58+5:302016-05-26T16:51:58+5:30
डोंबिवली एमआयडीसीमधील रासायनिक विभागाबाबत येथील रहिवासी वारंवार तक्रारी करीत आलेले आहेत. येथील रासायनिक वायू गळती आणि प्रदूषण हा देखील चिंतेचा विषय आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
ठाणे दि २६ - डोंबिवली एमआयडीसीमधील रासायनिक विभागाबाबत येथील रहिवासी वारंवार तक्रारी करीत आलेले आहेत. येथील रासायनिक वायू गळती आणि प्रदूषण हा देखील चिंतेचा विषय आहे. आज झालेली ही घटना फार मोठी असून भविष्यात असे प्रकार या एमआयडीसीत होऊ नयेत याची काळजी घ्यावी लागणार आहे.
या स्फोटाची चौकशी करून जे जबाबदार आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी आपली भूमिका असून मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री यांनाही आपण याविषयी बोललो असल्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज डोंबिवली सांगितले.
डोंबिवली पूर्व येथील एमआयडीसी टप्पा २ येथे अभिनव शाळेच्या जवळ फाईन केमिकल्स या कंपनीत बॉयलरचा मोठा स्फोट होऊन परिसरातील कंपन्यांचेही मोठे नुकसान झाले तर दोन जण दगावले. पालकमंत्र्यांनी याविषयीची माहिती घेताच तातडीने याठिकाणी धाव घेतली आणि पाहणी केली.
ज्या ठिकाणी हा स्फोट झाला आहे ती कंपनी पूर्णत: कोसळली असून ढिगा-याखालीदेखील काही कामगार अडकले असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली. संपर्ण मदतकार्य वेगाने आणि समन्वयाने करा अशा सूचनाही त्यांनी जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर आणि पोलिसांना दिल्या.
यावेळी काही स्थानिकांनी स्फोटाच्या अनुषंगाने पालकमंत्र्यांना भेटून आपले गाऱ्हाणे मांडले. स्वत: पालकमंत्र्यांनी एमआयडीसी तसेच औद्योगिक सुरक्षा विभाग , अग्निशमन दलाचे जवान यांच्याशी बोलून बचाव कार्य कसे पार पडणार ते जाणून घेतले.
नंतर वृत्तवाहिन्यांशी बोलतांना ते म्हणाले कि, हा केमिकल झोन आहे की इंजिनिअरिंग याबाबत निश्चित माहिती घेतली जाईल तसेच चुकीच्या पद्धतीने या कंपन्याना याठिकाणी परवानगी दिली असेल तर चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करण्यास सांगण्यात येईल. पालकमंत्र्यांनी नंतर रुग्णालयात जाऊन जखमींची देखील विचारपूस केली