पालकमंत्री गिरिश महाजन, दादा भुसे यांच्या समजुतीनंतर रास्ता रोको मागे; मृतांच्या कुटुंबियांना एक लाखाची मदत जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 01:28 PM2017-10-25T13:28:04+5:302017-10-25T14:08:49+5:30
नाशिक : मालेगाव तालुक्यातील अजंग-दाभाडी रस्त्यावरील ढवळीविहिरी तलावाच्या बंधार्यावरून शेतमजूरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर मंगळवारी संध्याकाळी ट्रॉलीसह तलावात उलटला. या दुर्घटनेत वडेल गावातील सात महिलांचा मृत्यू झाला असून पंधराहून अधिक महिला-पुरूष गंभीर जखमी झाले आहेत. घटनेनंतर अजंग व वडेल या दोन्ही गावे शोकसागरात बुडाली असून गावकर्यामध्ये संताप व्यक्त होत आहे. पालकमंत्री गिरीष महाजन, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भूसे यांनी दोन्ही गावांना आज सकाळी भेट देत रास्ता रोको करणार्या रहिवाशांची समजूत काढून मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. यानंतर रहिवाशांनी आंदोलन मागे घेत महिलांचे मृतदेह ताब्यात घेण्याची तयारी दर्शविली.
दरम्यान, महाजन व भुसे यांनी मृतांच्या नातेवाईकांची भेट घेऊन प्रत्येकी एक लाख रूपयांची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून देण्याचे जाहीर केले. तसेच सर्व जखमींचा खर्च शासन उचलणार असल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर नागरिकांचा रोष कमी झाला व महिलांचे मृतदेह ताब्यात घेण्यास तयारी दर्शविली.
सामान्य रुग्णालयातून नातेवाईकांसह नागरीकांनी मृतदेह ताब्यात घेत अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली आहे. वडेल व अजंग या दोन्ही गावांवर शोकाकूल व भावूक गंभीर वातावरण पसरले पसरले आहे. आर्थिकदृष्ट्या सर्व जखमी व मृत्यूमुखी पडलेल्या महिलांच्या कुटुंबियांची परिस्थिती हलाखीची असून मोलमजूरी करुन आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करत होते. अचानकपणे काळाने घाला घातल्याने वडेल गावातील सात महिलांना प्राण गमवावे लागले तर पंधराहून अधिक मजूर जखमी झाले आहेत.
या घटनेने नाशिक जिल्ह्यासह संपुर्ण राज्य हादरले आहे.