पालकमंत्र्यांच्या कार्यालयात दोघांचा विष प्राशनाचा प्रयत्न!
By admin | Published: December 2, 2015 02:57 AM2015-12-02T02:57:04+5:302015-12-02T02:57:04+5:30
सर्वोपचार जिल्हा रुग्णालयातील वादानंतर घडली घटना.
अकोला - निंभोरा व सांगवी येथील रहिवासी दोघांनी पालकमंत्री तथा राज्याचे गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या कार्यालयात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. सवरेपचार रुग्णालयात दाखल नातेवाईक रुग्णावर योग्य उपचार होत नसल्याने या दोघांनी वैद्यकीय अधिकार्यांना विचारणा केली असता, वैद्यकीय अधिकार्याने त्यांच्याविरुद्ध सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. त्यामुळे या दोघांनी आत्महत्येचा प्रयत्न केला.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सवरेपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या वृद्धावर योग्य प्रकारे उपचार करण्यात येत नसल्याने संतोष भगत व नितीन सपकाळे यांनी वैद्यकीय अधिकार्यांना याबाबत विचारणा केली. रुग्णाविषयी विचारणा केल्याने संतप्त झालेल्या वैद्यकीय अधिकार्याने या दोघांची तक्रार सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात केली. या तक्रारीवरील अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्यात यावी, यासाठी निंभोरा येथील रहिवासी संतोष शेषराव भगत व सांगवी येथील रहिवासी नितीन उत्तम सपकाळे यांनी पिशवीमध्ये विषाची बाटली घेऊन मंगळवारी सायंकाळी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांचे कार्यालय गाठले. पालकमंत्री कार्यालयात उपस्थित नसताना या दोघांनी पिशवीतील बाटली काढून पालकमंत्र्यांच्या कार्यालयात विष प्राशन केले. या प्रकाराची माहिती रामदासपेठ पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून दोघांनाही ताब्यात घेतले. पोलिसांनी सपकाळे व भगत यांच्याविरु द्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३0९ (आत्महत्येचा प्रयत्न करणे)नुसार गुन्हा दाखल केला.
यापूर्वीही घडला प्रकार
पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या कार्यालयात यापूर्वीही एका इसमाने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतर मंगळवारी पुन्हा विष प्राशनाचा प्रयत्न झाल्याने पालकमंत्र्यांच्या कार्यालयातील सुरक्षेसंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.