पालकमंत्र्यांची जीभ पत्रकारांवर घसरली, बुटाने मारण्याची भाषा
By Admin | Published: May 27, 2017 07:48 PM2017-05-27T19:48:37+5:302017-05-27T20:12:50+5:30
पालकमंत्र्यांनी तालुक्यातील माळहिवरा येथील सभेत पत्रकारांना चक्क बुटाने मारण्याची भाषा वापरली
>ऑनलाइन लोकमत
हिंगोली, दि. 27 - तूर खरेदीचा गोंधळ सुरू असताना पालकमंत्री दिलीप कांबळे तिकडे फिरकलेही नव्हते. आता तीन दिवस शेतकरी संवाद कार्यक्रमासाठी आल्यानंतर जणू पिकनिकला आल्याप्रमाणे त्यांनी मोंढ्यात भेट दिली. शेतक-यांचे म्हणनेही ऐकून घेतले नाही. त्यामुळे सर्वच माध्यमांनी टीकेचा सूर आळवताच पालकमंत्र्यांनी तालुक्यातील माळहिवरा येथील सभेत पत्रकारांना चक्क बुटाने मारण्याची भाषा वापरली.
पालकमंत्री दिलीप कांबळे हे हिंगोलीचे पालकमंत्री झाल्यापासून त्यांनी दिलेल्या आश्वासनांची जंत्री मोठी आहे. मात्र त्यातील पूर्ण झालेल्या कामांची संख्या तपासली तर शून्य आहे. त्यामुळे त्यांच्या या वाचाळवाणीचा सर्वच माध्यमांकडून वारंवार समाचार घेतला जातो. मात्र मोंढ्यात ते फक्त एकाच शेतक-याचे ऐकून निघून गेल्याचे वर्तमानपत्रांतून छापून आल्यानंतर आपली निष्क्रियता लपविण्यासाठी मी जंगलाचा राजा आहे, हे सांगण्याची मला गरज नाही, अशी आत्मस्तुती कांबळे यांनी केली. तर आम्ही हारतुरे स्वीकारले तर तुझ्या पोटात का दुखतयं, असा एकेरी उल्लेख केला. तर पत्रकारांची जातच बांडगुळ असे म्हणत या पत्रकारांच्या जीवावर आमचे राजकारण आहे का? पाकिटं दिली की, हे लगेच दुस-याचे. मी खरा आहे. मी कोणाला घाबरत नाही. दांडकेवाल्याला अन् लिहिणाºयांनाही. एखाद्याला जोड्याने मारेल, असे फुत्कार काढले.
वक्तव्याचा निषेध
पालकमंत्र्यांनी पत्रकारांबद्दल केलेल्या वक्तव्याचा विविध पत्रकार संघटनांनी निषेध केला. रविवारी याबाबत जिल्हा प्रशासनाला निषेधाचे निवेदन देण्यात येणार आहे. तसेच पत्रकार आंदोलनाच्याही पवित्र्यात आहेत.