गुढीपाडवा : फॅशनच्या युगातही मराठमोळ्या परंपरा टिकवून ठेवणारा सण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2018 07:36 AM2018-03-18T07:36:17+5:302018-03-18T07:36:17+5:30

 वसंत ऋतूतील चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा, हाच हिंदू नववर्षाचा पहिला दिवस होय. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. गुढीपाडवा या सणाला एक आगळ मराठमोळपण आहे ते महाराष्ट्रीयन संस्कृतीमुळे! चैत्र महिन्यात सभोवतालच्या निसर्गात बदल होऊ लागतात.

Gudi Padva: A festival that preserves Marathi tradition in the fashion era | गुढीपाडवा : फॅशनच्या युगातही मराठमोळ्या परंपरा टिकवून ठेवणारा सण

गुढीपाडवा : फॅशनच्या युगातही मराठमोळ्या परंपरा टिकवून ठेवणारा सण

googlenewsNext

 वसंत ऋतूतील चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा, हाच हिंदू नववर्षाचा पहिला दिवस होय. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. गुढीपाडवा या सणाला एक आगळ मराठमोळपण आहे ते महाराष्ट्रीयन संस्कृतीमुळे! चैत्र महिन्यात सभोवतालच्या निसर्गात बदल होऊ लागतात. वसंत ऋतूची चाहूल लागते आणि शुष्क झालेली सृष्टी चैत्राच्या नव पालवीने फुलून जाते. निसर्गातील त्या परिवर्तनाचे, नवचैतन्याचे स्वागत करण्याचा उद्देश दारी गुढी उभारण्यामागे दिसून येतो. 

        गुढीपाडवा ह्या सणाबाबत वेगवेगळ्या आख्यायिका आहेत. ब्रम्हदेवाने हे विश्व निर्माण केले ती चैत्र शुद्ध प्रतिपदेची सकाळ मानतात. तसेच याच दिवशी श्रीरामचंद्र चौदा वर्षांच्या वनवासानंतर रावणाचा वध करून अयोध्येत परत आले असेही मानले जाते. त्या वेळी घरांना तोरणे लावून, गुढ्या उभारून आनंद साजरा केला. म्हणून आजही लोक गुढ्या उभारून तो दिवस साजरा करतात. गुढीला धर्मशास्त्रात ‘ब्रम्हध्वज’ असे म्हणतात. ‘ब्रह्म’ हा शब्द बृह म्हणजे वाढणे!
           गुढीला कडुलिंबाची डहाळी लावली जाते त्यामागे शास्त्रीय कारण आहे कि ते एक उत्तम कीटकनाशकही आहे. पाडव्याला पंचांग पूजन व वाचन करतात गुढीपाडव्याला काही धार्मिक विधी पार पाडले जातात. त्यात ब्रम्हपूजा हा महत्वाचा विधी असतो. पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असल्याने त्या दिवशी नवीन कामे,संकल्प यांचा प्रारंभ केला जातो.
          
           महाराष्ट्रात आगरी-कोळी, ब्राह्मण, मराठा, आदिवासी अश्या अनेक समाजात वेगवेगळ्या पद्धतीने गुढीपाडवा सण पारंपारिक साजरा केला जातो. गुढीपाडवा साजरा करण्याची पद्धत काळानुसार बदलत गेली आहे. मात्र तरीही पालघर, मुंबई, ठाणे येथे अनेक ठीकाणी  पारंपरिक पोषांखात स्त्री-पुरुष आनंदाने स्वागत यात्रेत सहभागी होतात. 
      
          आगरी-कोळी समाजात नव विवाहित वधू तर होळी सणानंतर येणाऱ्या पाडव्याची आतुरतेने वात बघत असतात. आगरी, ब्राह्मण समाजात नववारी म्हणजे संस्कृतीच प्रतिक. जरिचं लुघडं तर प्रत्येक स्त्रीचा जीव कि प्राणचं! आणि पैठणीचा रुबाब तर काही औरच!!  नववारी-पैठणी नेसलेल्या स्त्रियां, त्यांच्या नाकातील चमकणारी आकर्षक सोन्याची नथ, कानातले कर्णफुलं, गळ्यातील लक्ष्मीहार, मंगळसूत्र, मोत्यांचा सर, सोन्याचे बाजूबंध, हिरेजडीत बांगड्या,कमरपट्टा, अर्धचंद्रकोर टिकली, हळद कुंकू, चांदीचे पैंजण, केसांचा पारंपारिक अंबाडा त्यातून डोकावणारे सुवर्णफुल.. आणि रुळणारे गजरे.!! सांर अद्वितीय.. अगदी डोळ्याचं पारण फेडणार निखळ, सोज्वल सौंदर्य आणि ह्या साऱ्यांनाच कवेत घेऊ पाहणारी बाहू-खांद्यावरची रेशीम शाल.!! साक्षात लक्ष्मीचं...!!

          त्या दिवशी पहाटे घरातील सर्व माणसे तैलाभ्यंग करून गरम पाण्याने स्नान करतात. नंतर कडुलिंबाची पाने भक्षण करतात. मुख्यत्वे वसई विरार आणि कोकणातील आगरी, ब्राह्मण समाजात आजही  गावांमध्ये अंगण शेणाने सारवून रांगोळ्या काढल्या जातात. त्यांनंतर गुढी उभारण्याची जागा स्वच्छ केली जाते. स्वच्छ धुतलेल्या नवीन बांबूला रंगीत नववारी, साडी, रेशमी वस्त्र, कडुलिंबाची डहाळी, आंब्याची डहाळी, फुलांचा हार व गठमाळ (साखरेची गाठ) बांधतात. आणि त्यावर तांब्या,गडू उलथ ठेवला जातो. काठीला कुंकू, गंध, अक्षता,फुलांच्या माळा लावतात. अशी तयार झालेली गुढी डौलाने उभी करतात. परंपरेप्रमाणे गुढीची पूजा करून तिला वरण, पुरण पोळी, श्रीखंड, दूध-साखर,पंचपक्वान्नाचा नैवेद्य दाखवला जातो. निरंजन आणि उदबत्ती लावली जाते.
     ब्रम्हध्वज नमस्तेsतु सर्वाभिष्ट फलप्रद
      प्राप्तेस्मिन संवत्सरे नित्यं मद्गृहे मंगलं कुरु

म्हणत गुढीची पूजा केली जाते. आणि  संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी नैवेद्य दाखवून ती विधीपूर्वक उतरवण्याची येथे पद्धत आहे!
            अशी ही ग्रामीण भागातील गुढीपाडव्याची परंपरा फॅशनच्या युगातही टिकून आहे हेच महत्वाचे!!
      

Web Title: Gudi Padva: A festival that preserves Marathi tradition in the fashion era

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.