अमावस्येच्या दिवशी गुढीपाडवा
By admin | Published: March 3, 2017 02:03 AM2017-03-03T02:03:06+5:302017-03-03T02:03:06+5:30
अमावस्या संपल्यावर गुढी उभारून गुढीपाडवा साजरा करावयाचा असल्याची माहिती ज्येष्ठ पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासक दा.कृ. सोमण यांनी दिली.
मुंबई : यंदा चैत्र शुक्ल प्रतिपदा क्षय तिथी असल्याने मंगळवार २८ मार्च रोजी सकाळी ८ वाजून २७ मिनिटांनी फाल्गुन अमावस्या संपल्यावर गुढी उभारून गुढीपाडवा साजरा करावयाचा असल्याची माहिती ज्येष्ठ पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासक दा.कृ. सोमण यांनी दिली.
या वर्षी चैत्र शुक्ल प्रतिपदा तिथी कोणत्याही दिवशी सूर्योदयाला नाही. अशा तिथीला ‘क्षय तिथी’असे म्हणतात. गुढी पाडव्याच्या दिवशी नववर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेक गावांत शोभायात्रा काढण्यात येतात. या शोभायात्रेचा प्रारंभ मंगळवार २८ मार्च रोजी सकाळी ८.२७ पूर्वी करण्यास काहीही हरकत नाही.
मात्र शोभायात्रा संपल्यावर सकाळी ८.२७ नंतर गुढी उभारून तिची पूजा करावी. २८ मार्च २०१७ रोजी सकाळी ८.२७ वाजता फाल्गुन अमावस्या संपल्यावर गुढीपाडवा साजरा करायचा आहे. त्यामुळे शुक्रवार ८ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या नवीन पंचांगात दोन गुढीपाडवा देण्यात आले आहेत.
यापूर्वी २८ मार्च १९९८, १९ मार्च २००७ आणि ६ एप्रिल २००८ रोजी अशी स्थिती आल्याने फाल्गुन अमावस्या संपल्यावर गुढी उभारून गुढीपाडवा साजरा करण्यात आला होता. या वर्षानंतर पुन्हा १९ मार्च २०२६ रोजी चैत्र शुक्ल प्रतिपदा क्षय तिथी येणार असल्याने फाल्गुन अमावस्या संपल्यावर गुढीपाडवा साजरा करावा लागणार असल्याचेही सोमण यांनी सांगितले. (प्रतिनिधी)