अमावस्येनंतर उभा करा गुढी !

By admin | Published: March 27, 2017 12:35 PM2017-03-27T12:35:05+5:302017-03-27T12:35:05+5:30

अमावस्येनंतर उभा करा गुढी !

Gudi is standing after the new moon! | अमावस्येनंतर उभा करा गुढी !

अमावस्येनंतर उभा करा गुढी !

Next

अमावस्येनंतर उभा करा गुढी !
गुढीपाडव्याला सकाळी ८.२७ नंतर करा पूजन
सोलापूर : शके १९३९ या नूतन वर्षारंभाच्या दिवशी म्हणजे मंगळवार दि. २८ मार्च रोजी सूर्योदयानंतर सकाळी ८.२७ पर्यंत अमावस्या असून, प्रतिपदेची समाप्ती बुधवारच्या सूर्योदयापूर्वी म्हणजेच पहाटे ५.४५ वाजता असल्याने प्रतिपदेचा क्षय आहे. त्यामुळे मंगळवारी अमावस्या समाप्तीनंतर म्हणजेच सकाळी ८.२७ नंतर गुढी (ब्रह्म ध्वज) उभारून पूजन करावे तसेच पंचांगस्थ श्री गणेशाची पूजा करावी, असे आवाहन पंचांगकर्ते मोहन दाते यांनी केले आहे. यापूर्वी १९९८, २००७ मध्ये या पद्धतीने अमावस्येनंतर पाडवा साजरा झाला होता; तर पुन्हा १९ मार्च २०२६ रोजी पुन्हा अशाच प्रकारने अमावस्या समाप्तीनंतर गुढीपाडवा साजरा होईल, असेही दाते म्हणाले.
अनेक गावांमध्ये गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रा, पहाटगाणी अशा अनेक सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. हे सर्व कार्यक्रम नेहमीप्रमाणे ८.२७ पूर्वीही करता येतील; मात्र गुढीचे पूजन मंगळवारी ८.२७ नंतर करावे, असे सांगून दाते म्हणाले की, ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केल्यानंतर सृष्टीला जी चालना दिली, तो पहिला दिवस समजला जातो. आपल्याकडे गुढीपाडवा, अक्षय्यतृतिया, दसरा, दिवाळी पाडवा हे साडेतीन मुहूर्त शुभदिवस आहेत. यामध्ये नूतन संवत्सराची सुरूवात करणारा म्हणून चैत्र शुद्ध प्रतिपदेचा दिवस हा एक महत्त्वाचा शुभदिवस मानला जातो. आपल्याकडे प्रत्येक संवत्सराला (वर्षाला) नाव दिलेले असते. तसेच शके १९३९ या संवत्सराचे नाव ‘हेमलंबी संवत्सर’ असे आहे.
नवीन वर्षाची सुरुवात होताना त्याला ऐतिहासिक, नैसर्गिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्व असले पाहिजे. तसे या चैत्रापासून सुरू होणाऱ्या नवीन वर्षात वसंतऋतूचे आगमन झालेले असल्याने उत्साहाचे असे नैसर्गिक वातावरण तयार झालेले आहे. सणांचा आणि ऋतूंचा संबंध हा एकमेकांना पूरक असतो. त्यामुळे पुढे येणाऱ्या उन्हाळ्याचा त्रास होऊ नये म्हणून या दिवसापासून कडुनिंबाचा वेगवेगळ्या पद्धतीने वापर करण्यास सांगितले आहे. कडुनिंबामध्ये औषधी गुणधर्मामुळे उन्हाळ्यापासून होणाऱ्या उष्णतेच्या विकारांचा त्रास कमी होतो, असे दाते म्हणाले.
सध्या व्यवहारात असलेल्या इंग्रजी कालगणनेनुसार काहीजण १ जानेवारी रोजी काही नवीन संकल्प, नियम, उपक्रम करण्याचे ठरवितात. त्याचप्रमाणे विविध कारणांनी महत्त्व असलेल्या या नवीन संवत्सरामध्ये चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून चांगले संकल्प केल्यास अधिक योग्य होईल. संपूर्ण जगावर परिणाम करणारे सूर्य आणि चंद्र यांच्या गणितावर आधारित असलेली कालगणना पंचांगामुळे आपणास समजू शकते. या दोन्ही ग्रहांचा योग घडत असल्याने तिथी, वार आदींवर आधारित चैत्र ते फाल्गुन या बारा महिन्यांची रचना करण्यात आलेली आहे, असे दाते यांनी सांगितले.
--------------------------
नवीन संवत्सरामध्ये...
* २८ मार्च ते १७ मार्च २०१८ असा या शकाचा कालावधी आहे.
* या शकामध्ये केवळ २ गुरूपुष्यामृत योग आहेत. २ अंगारकी संकष्टी चतुर्थी आहेत.
* दिवाळी पूर्ण चार दिवस आलेली आहे.
* शुक्रास्थ असल्याने पौष (डिसेंबर व जानेवारी) या महिन्यात विवाह, उपनयन, वास्तुशांती अशा मंगलकार्याचे मुहूर्त नाहीत.
* या वर्षात २ चंद्रग्रहणे भारतात दिसणार आहेत व २ सूर्यग्रहणे आहेत; पण ती भारतात दिसणार नसल्याने वेधाचे नियम पाळण्याची गरज नाही.
* यंदा पर्जन्यमान कमी राहील.
----------------
यंदा गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी अमावस्या असल्यामुळे हा पाडवा शुभ नाही, अशा प्रकारच्या काही अफवा लोकांमध्ये पसरविल्या जात आहेत; पण हा साडेतीन मुहूर्तापैकी एक महत्त्वाचा मुहूर्त असल्याने असा कोणताही दोष नाही. प्रतिवर्षीप्रमाणेच हा पाडवाही शुभ फलदायी असून, लोकांनी उत्साहात साजरा करावा.
- मोहन दाते, पंचांगकर्ते

Web Title: Gudi is standing after the new moon!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.