दहावीच्या विद्यार्थ्यांना ‘रोबोमेट+’चे मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2017 05:32 AM2017-12-09T05:32:03+5:302017-12-09T05:32:18+5:30
राज्यातील मराठी माध्यम शाळांमधील दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ग्लोबल एज्युकेशन ट्रस्टने तयार केलेल्या ‘रोबोमेट+’ या शैक्षणिक अॅपचे अनावरण शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी गुरुवारी केले.
मुंबई : राज्यातील मराठी माध्यम शाळांमधील दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ग्लोबल एज्युकेशन ट्रस्टने तयार केलेल्या ‘रोबोमेट+’ या शैक्षणिक अॅपचे अनावरण शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी गुरुवारी केले. हे अॅप मोफत उपलब्ध असून, त्यातील व्हिडीओ लेक्चर्सच्या मदतीने विद्यार्थ्यांना तज्ज्ञ शिक्षकांचे बहुमोल मार्गदर्शन मिळणार आहे.
ट्रस्टने दिलेल्या माहितीनुसार, अॅपमध्ये प्रश्नोत्तरे, प्रश्नपत्रिकांचे स्वरूप, बहुपर्यायी प्रश्न, कठीण संकल्पना सोप्या भाषेत, शंकानिरसन अशा सर्व बाबींचा समावेश आहे. त्याचा वापर विद्यार्थी कधीही, कुठेही करून गुणांमध्ये भरघोस वाढ करू शकतो, असा दावा ट्रस्टने केला आहे.
या अॅपमुळे विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगली मदत होणार असल्यामुळे त्यांच्यासाठी अॅपच्या माध्यमातून चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे. डिजिटल इंडियाअंतर्गत असलेले हे अॅप वापरल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीचे स्वप्न साकार होईल, अशी प्रतिक्रिया शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केली आहे.