कवींचा मार्गदर्शक स्तंभ म्हणजे ‘सुरेश भट’...
By Admin | Published: March 14, 2017 07:55 AM2017-03-14T07:55:48+5:302017-03-14T07:55:48+5:30
पुणे ही गझलांची राजधानी’ असे संबोधणारे कवी सुरेश भट यांची पुण्याकडं पावले वळली तो काळ साधारणपणे ७८ ते ८० च्या दशकातला. पुण्यातल्या ‘पंताच्या गोटात’ या ठिकाणी
पुणे : पुणे ही गझलांची राजधानी’ असे संबोधणारे कवी सुरेश भट यांची पुण्याकडं पावले वळली तो काळ साधारणपणे ७८ ते ८० च्या दशकातला. पुण्यातल्या ‘पंताच्या गोटात’ या ठिकाणी त्यांच्या सासऱ्यांकडे सुरुवातीला त्यांचा मुक्काम असायचा आणि त्यानंतर महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या अतिथी निवासात ते राहायला यायचे... ते पुण्यात आल्यावर रात्ररात्र मैफली रंगायच्या... आपल्या मौलिक मार्गदर्शनातून मुक्तछंद लिहिणाऱ्या कवींना त्यांनी गेय कवितेकडे वळविले... अशा शब्दांत ‘सुरेश भट’ या मराठी साहित्यातील ‘कलंदर माणूस’ आणि त्यांच्या पुण्यातील वास्तव्याच्या आठवणींचा ‘शब्दपट’ प्रसिद्ध कवी रमण रणदिवे उलगडत होते... प्रस्थापित कवींपैकी सुरेश भट हे एकमेव असे कवी होते ज्यांनी नवोदित कवींना वेळ दिला, त्यांच्या कविता ऐकल्या आणि त्याला दिशा देण्याचे काम केले, असे
भट यांच्याविषयी ते अभिमानाने
सांगत होते.
‘मलमली तारुण्य माझे,’ ‘तरुण आहे रात्र अजूनी,’ ‘मालवून टाक दीप,’ ‘भोगले जे दु:ख त्याला सुख म्हणावे लागले,’ ‘मी अश्रूंच्या डोहात बुडालो नाही’ यांसारख्या शृंगारिक, दु:खाचा आक्रोश करणाऱ्या आणि समाजव्यवस्थेवर बोट ठेवणाऱ्या सुरेश भट यांच्या कविता आजही रसिकमनाचा ठाव घेतात, मराठी साहित्यात ‘गझल’ हा काव्यप्रकार रुजविणाऱ्या सुरेश भट यांची आज पुण्यतिथी. त्यांचा सहवास लाभलेल्या रमण रणदिवे यांनी भट यांच्या स्मृतींना ‘लोकमत’शी बोलताना उजाळा दिला. हाताचे बोट धरून शिक्षक विद्यार्थ्याला कसे शिकवितात तसे सुरेश भट कवींना गझल लिहायला शिकवायचे. पुण्यात आले असता पाच दिवस ते माझ्या घरी उतरले होते. त्यावेळी ‘सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या, तुझेच गीत गात आहे, अजून ही वाटते मला की, अजूनही चाँद रात आहे’ यांसारख्या अनेक कवितांमध्ये शब्दांची दुरुस्ती येते, ती तुम्ही जाणीवपूर्वक करता का? असा प्रश्न मी त्यांना विचारला, त्यावर शब्दांची द्विरुक्ती केल्यामुळे त्या ओळीची प्रासादिकता आणि अर्थघनता वाढते, असे त्यांनी दिलेले उत्तर मनावर कोरले गेले आहे. (प्रतिनिधी)