मीरा-भार्इंदरसह कांदिवलीतील सात स्केटिंगपटू गिनीज बुकात
By Admin | Published: June 25, 2017 06:25 PM2017-06-25T18:25:17+5:302017-06-25T18:25:17+5:30
1 ते 3 जूनदरम्यान पार पडलेल्या जागतिक विक्रमांच्या स्पर्धेत सलग 51 तास स्केटिंग करून गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळवले आहे.
राजू काळे/ऑनलाइन लोकमत
भार्इंदर, दि. 25 - मीरा-भार्इंदरसह मुंबईच्या कांदिवलीमधील विविध ठिकाणी राहणा-या सात स्केटिंगपटूंनी कर्नाटकमधील बेळगाव येथे 1 ते 3 जूनदरम्यान पार पडलेल्या जागतिक विक्रमांच्या स्पर्धेत सलग 51 तास स्केटिंग करून गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळवले आहे.
भार्इंदर येथील राई गावात राहणारा अमन विक्रम राऊत आणि भार्इंदर पूर्वेकडील गोल्डन नेस्टमध्ये राहणारा प्रथम अभयसिंग ओस्तवाल हे दोघे मीरा रोड येथील आर. बी. के या खासगी शाळेत इयत्ता आठवीत शिक्षण घेत आहेत. तर मीरा रोड येथील गोल्डन नेस्टमध्ये राहणारे भव्य कल्पेश सोनी, क्रिश जतीन मायावंशी आणि सावित दिनेश बंगेरा हे उत्तन-गोराई मार्गावर असलेल्या रामरत्न विद्यामंदिर या खासगी शाळेत अनुक्रमे 5वी, 6वी व 3री इयत्तेत शिक्षण घेत आहेत. याच परिसरात राहणारा विजय मंगेश चापवाले हा मीरा रोड येथील सरदार वल्लभभाई पटेल या खासगी शाळेत इयत्ता 6वीत शिकत आहे.
तर कांदिवली येथे राहणारा हर्ष प्रशांत जायगाडे या सर्वांना स्केटिंगची आवड असल्याने त्यांना त्यांच्या पालकांनी मीरा रोड येथे स्केटिंग प्रशिक्षक दयानंद करुणाकर शेट्टी व विरार क्षितिज शिवमुर्ती सिंह यांच्याकडे प्रशिक्षणासाठी पाठविले. गेल्या अनेक महिन्यांपासुन प्रशिक्षण घेत असलेल्या या मुलांनी त्यातील निपुणता जोपासून अव्वल व अनेक तास सतत स्केटिंग करण्याचे कौशल्य आत्मसात केले.
अनेक जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरांवरील स्पर्धांत सहभाग घेत चमकदार कामगिरी केली. त्यांच्यामध्ये अनेक तास सलग स्केटिंग करण्याची क्षमता असल्याने प्रशिक्षकांनी त्यांना बेळगाव येथील प्रख्यात स्केटिंगपटू ज्योती चिंदक यांनी आयोजित केलेल्या जागतिक स्पर्धेत सहभाग घेण्याचा सल्ला दिला. त्याला घरातील मंडळींनी मान्यता दिल्यानंतर ते मे महिन्यात बेळगावला रवाना झाले. स्पर्धेला 1 जूनला सुरुवात झाली. त्यांनी तिस-या दिवसापर्यंत (3 जून) न थकता सलग 51 तास स्केटिंग केली. या जागतिक विक्रमामुळे त्यांची नोंद गिनीज बुकमध्ये करण्यात आली. यामुळे मीरा-भार्इंदर आणि कांदिवलीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेल्याने गिनीज बुकात नोंद झालेले ते एकमेव ठरल्याचा आम्हाला अभिमान असल्याचे त्यांच्या पालकांसह प्रशिक्षकांनी सांगितले.