महाराष्ट्रातून दररोज ४00 ट्रक कापूस गुजरातकडे!

By Admin | Published: December 26, 2015 02:42 AM2015-12-26T02:42:29+5:302015-12-26T02:42:29+5:30

राज्यातील कापसाचे दर झाले ४६00 प्रतिक्विंटल.

Gujarat gets 400 trucks of cotton from Gujarat every day! | महाराष्ट्रातून दररोज ४00 ट्रक कापूस गुजरातकडे!

महाराष्ट्रातून दररोज ४00 ट्रक कापूस गुजरातकडे!

googlenewsNext

अकोला: गुजरातमध्ये कापसाला बोनस जाहीर झाला असून, दरही बर्‍यापैकी असल्याने महाराष्ट्रातून दररोज ४00 पेक्षा जास्त ट्रक कापूस गुजरातला जात आहे. महाराष्ट्राच्या बाजारपेठेत कापसाचे दर ४,६00 ते ४,७00 रुपये प्रतिक्विंटल आहेत; परंतु गुजरातमधील व्यापारी यापेक्षा जास्त दर देऊन कापूस खरेदी करीत आहेत. त्यामुळे येथील कापूस व्यापार्‍यांचा ओढा गुजरातकडे आहे. यावर्षी कापूस उत्पादक देशात कापसाचे उत्पादन घटले असून, कापसाची मागणी वाढली आहे. आजमितीस कापसाच्या २८ लाख गाठी निर्यात झाल्याचे वृत्त आहे. त्यामुळे खासगी बाजारात कापसाचे दर ४ हजार ६00 रूपये प्रतिक्विंटल आहेत. कमी पावसामुळे गुजरातमध्ये यावर्षी जवळपास ३0 लाख क्विंटलने कापसाचे उत्पादन घटले. त्यामुळे गुजरातमधील कापसावर आधारित उद्योग, कारखान्यांना कापूस कमी पडणार आहे. या पृष्ठभूमीवर गुजरातच्या व्यापार्‍यांनी कापसाचे प्रतिक्विंटल दर वाढवल्याने महाराष्ट्रातील शेतकर्‍यांनी आता गुजरातमधून येणार्‍या व्यापार्‍यांना कापूस विकण्याचा सपाटा लावला आहे. यावर्षी भारतात कापसाचे उत्पादन घटले, तसेच ते पाकिस्तान, अमेरिका आणि चीनमध्येही घटले आहे. त्यामुळे यावर्षी निर्यातीला चांगली संधी चालून आली आहे. मागील वर्षभरात भारताने केवळ ४0 लाख गाठींची निर्यात केली होती. यावर्षी आतापर्यंत २८ लाख गाठींच्यावर कापसाची निर्यात झाली आहे. विदेशात कापसाची मागणी वाढली आहे, तसेच सरकीचे दरही वाढले आहेत. या अनुकूल परिस्थितीचा लाभ यावर्षी कापूस उत्पादक शेतकर्‍यांना मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे खासगी बाजारात कापसाची आवक वाढली असून, आजमितीस शेतकर्‍यांनी ९0 लाख क्विंटलच्या वर कापूस विकला आहे.

*एका ट्रकमध्ये १00 क्विंटल कापूस!

     दररोज ४00 ट्रकच्या वर कापूस गुजरातला चालला असून, एका ट्रकमध्ये जवळपास ९0 ते १00 क्विंटल कापूस असतो.

Web Title: Gujarat gets 400 trucks of cotton from Gujarat every day!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.