गुजरात-मुंबई रेल्वे सेवा १२ तास ठप्प
By admin | Published: July 5, 2016 01:52 AM2016-07-05T01:52:51+5:302016-07-05T01:52:51+5:30
जेएनपीटीहून मुरादाबाद येथे जात असलेल्या मालगाडीच्या डब्यांची चाके सोमवारी पहाटे २.५० च्या सुमारास लोणीपाडा (थर्मल पावर) डहाणू येथे लाईन क्रॉसींगमध्ये अडकल्याने तिचे ११ डबे घसरले.
- शौकत शेख, डहाणू
जेएनपीटीहून मुरादाबाद येथे जात असलेल्या मालगाडीच्या डब्यांची चाके सोमवारी पहाटे २.५० च्या सुमारास लोणीपाडा (थर्मल पावर) डहाणू येथे लाईन क्रॉसींगमध्ये अडकल्याने तिचे ११ डबे घसरले. या अपघातात जिवितहानी झाली नसली, तरी मुंबईहून गुजरातमार्गे दिल्लीला जाणाऱ्या व येणाऱ्याही हजारो प्रवाशांना याचा फटका बसला. अनेक लांबपल्याच्या गाड्या १२ तासांहून अधिक काळ ठिकठिकाणी अडकून पडल्याने त्यामधील प्रवाशांचे अतोनात हाल झाले. या अपघातामुळे पश्चिम रेल्वेच्या लांब पल्याच्या वाहतुकीचे तीनतेरा वाजले.
अपघाताचे नेमके कारण प्रशासनाने स्पष्ट केले नसून त्याबाबत चौकशी करणार असल्याचे सांगण्यात आले. दिल्ली व गुजरातकडून मुंबईकडे येणाऱ्या १२ लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या. राजधानी, आॅगस्ट क्रांती, सयाजी एक्सप्रेस यासारख्या लांबपल्याच्या अतिजलद गाड्या ओव्हरहेड वायर तुटल्याने डिझेल इंजिनच्या साह्याने पुढे नेण्यात आल्या. रेल्वे सेवा पूर्ववत करण्याचे प.रेचे प्रयत्न सुरू आहेत. पावसामुळे अडथळा निर्माण झाला. त्यामुळे सध्या बोईसर ते विरार लोकल सेवा सुरू करण्यात आली आहे. दरम्यान डहाणू रेल्वेस्थानकात खोळंबलेल्या प्रवाशांना बोईसर, ठाणेपर्यंत सोडण्यासाठी बसेसची व्यवस्था करण्यात आली.