गुजरात पोलिसांमुळेच मोदींना परवानगी नाकारली
By admin | Published: May 10, 2014 12:57 AM2014-05-10T00:57:49+5:302014-05-10T00:57:49+5:30
गुजरात पोलिसांनी दिलेल्या माहितीच्या आधारेच वाराणशी येथे नरेंद्र मोदी यांच्या रॅलीला परवानगी नाकारली, असा खुलासा निवडणूक आयोगाने केला आहे.
नवी दिल्ली : गुजरात पोलिसांनी दिलेल्या माहितीच्या आधारेच वाराणशी येथे नरेंद्र मोदी यांच्या रॅलीला परवानगी नाकारली, असा खुलासा निवडणूक आयोगाने केला आहे. प्रचारसभेचे स्थळ मोदींसाठी अयोग्य असल्याचे गुजरात पोलिसांनी सांगितल्याने हा निर्णय घेतला. पण भाजपाला कळविण्यात विलंब झाल्याबद्दल खेदही व्यक्त केला. मोदींच्या प्रचारसभेसाठी निवडण्यात आलेले मैदान अयोग्य असल्याची माहिती त्यांच्या अत्याधुनिक सुरक्षा पथकात समाविष्ट गुजरातच्या एका पोलीस अधिकार्याने दिली होती, असा खुलासा निवडणूक आयुक्त एच.एस. ब्रह्मा यांनी शुक्रवारी केला. गुरुवारी मोदींनी आयोगाचा आदेश धुडकावत रोड शो घेतला तसेच भाजपाने आयोगावर पक्षपातीपणाचा आरोप करीत जोरदार टीका केल्यानंतर ब्रह्मा यांनी ही बाब उघड केली. मैदान छोटे असल्यामुळे त्या ठिकाणी अतिशय दाटी होईल त्यामुळे सभा घेणे अयोग्य राहील असे या गुजरातच्या पोलीस अधिकार्याने स्पष्ट केले होते, असे ते येथे महिला पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले. मोदी गुरुवारी वाराणशीतील बेनियाबाग येथे रॅलीला संबोधित करणार होते, मात्र त्यांना जिल्हा प्रशासनाने सुरक्षेच्या कारणावरून परवानगी नाकारली. ते स्थळ सभा घेण्यायोग्य नव्हते केवळ हाच प्रश्न होतो, असे ते म्हणाले.
प्रकरण दुर्दैवी...
हे संपूर्ण प्रकरण दुर्दैवी आहे. ते एवढे ताणायला नको होते. वाराणशी हा व्हीआयपी मतदारसंघ असून अधिकार्यांना महत्त्वाच्या व्यक्तीबाबत निर्णय घ्यायचा होता. त्यामुळे तो तडकाफडकी कळविणे आवश्यक होते. या संपूर्ण प्रक्रियेत अधिकार्यांनी तातडीने पावले उचलणे गरजेचे होते. त्यासाठी साधारणपणे २० मिनिटे लागत असतील तर १० किंवा ५ मिनिटांतच निर्णय व्हायला हवा होता, असे ब्रह्मा म्हणाले.