आसूड यात्रा गुजरात पोलिसांनी रोखली, नेत्यांना घेतलं ताब्यात
By Admin | Published: April 20, 2017 05:52 PM2017-04-20T17:52:45+5:302017-04-20T18:43:54+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधून सुरू झालेली प्रहार व शेतकरी संघटनेची सीएम टू पीएम आसूड यात्रा गुजरात पोलिसांनी रोखली
>ऑनलाइन लोकमत
अहमदनगर, दि. 20 - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधून सुरू झालेली प्रहार व शेतकरी संघटनेची सीएम टू पीएम आसूड यात्रा गुजरात पोलिसांनी रोखली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमधील वडनगर गावाकडे निघाली होती. महाराष्ट्रातील नवापूर तालुका सरहद्दीबाहेर गुजरात राज्यात प्रवेश करताच गुजरात पोलिसांनी ही यात्रा अडवली.
आसूड यात्रेचे नेतृत्व करणारे प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील, कालिदास आपेट, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष बाळासाहेब पटारे आदींना गुजरात पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, असे स्वतः पटारे यांनी "लोकमत"ला सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वडनगरमध्ये उद्या आसूड यात्रा पोहोचणार होती. पण, त्याआधीच आज नंदुरबारच्या नवापूर चेकपोस्टवर ही आसूड यात्रा रोखण्यात आली. यामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून याचा निषेध केला.
सध्या चेकपोस्टर गुजरात पोलिसांना प्रचंड फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
यापूर्वी, आसूड यात्रा पूर्ण होण्याआधी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा अन्यथा महात्मा गांधींच्या भूमिकेत मोदींच्या वडनेरमध्ये पोहोचणारी यात्रा भगतसिंग यांची भूमिका घेईल असा खणखणीत इशाराही बच्चू कडू यांनी सरकारला दिला.