...म्हणून गुजराती समाजाने नाकारले शिवसेनेला
By admin | Published: February 24, 2017 09:29 AM2017-02-24T09:29:04+5:302017-02-24T09:32:53+5:30
मुंबई महापालिका निवडणुकीत लालबाग, परळ, वरळी, प्रभादेवी, दादर, माहिम या मराठी पट्ट्यात शिवसेनेने खणखणीत यश मिळवले.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 24 - मुंबई महापालिका निवडणुकीत लालबाग, परळ, वरळी, प्रभादेवी, दादर, माहिम या मराठी पट्ट्यात शिवसेनेने खणखणीत यश मिळवले. पण अमराठी विशेषकरुन गुजराती मतदारांचा विश्वास मात्र सेनेला जिंकता आला नाही. गुजरातमधील पाटीदार पटेल आरक्षण आंदोलन समितीचा नेता हार्दिक पटेलला प्रचारासाठी आणण्याच्या खेळीचा शिवसेनेला अजिबात फायदा झाला नसल्याचे निकालावरुन दिसत आहे.
शिवसेनेने 11 गुजराती उमेदवार दिले होते. पण त्यातील एकही निवडून येऊ शकला नाही. मुंबईतील गुजराती समाज प्रामुख्याने व्यापारी आणि व्यावसायिक आहे. हा समाज भाजपाचा पारंपारिक मतदार समजला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे मुंबईतील गुजराती समाज भाजपावर नाराज असेल असे शिवसेनेने गृहित धरुन शिवसेनेने हार्दिक पटेलला प्रचारासाठी मुंबईत आणले. पण त्याचा काही फायदा झाला नाही.
उपनगरातील घाटकोपर, मुलुंड, मालाड, कांदिवली आणि बोरिवली या पट्टयात भाजपाने चांगले यश मिळवले. इथल्या 49 पैकी 36 जागा भाजपाने जिंकल्या. भाजपाबरोबरची युती तुटल्यानंतर शिवसेनेने गुजराती मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरु केला. त्यामुळे शिवसेना व्होट बँक म्हणून आपल्याकडे पाहत आहे अशी मतदारांची भावना झाली तसेच यापूर्वीची शिवसेनेची पार्श्वभूमी गुजराती विरोधाची होती. त्यामुळे गुजराती मतदार भाजपाच्या पाठिशीच ठामपणे उभा राहिला असे या समाजाच्या एका नेत्याने सांगितले.
मुंबईतील गुजराती समाज जनसंघाच्या दिवसांपासून भाजपासोबत आहे. 60च्या दशकात जयवंतीबेन मेहता जनसंघाच्या तिकीटावर निवडून आल्या होत्या. शिवसेनेने समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला पण आज सर्व समाज भाजपाच्या मागे उभे राहिले. त्याशिवाय असे यश शक्य नव्हते अशी प्रतिक्रिया खासदार किरीट सोमय्या यांनी दिली.