मुंबईच्या विकासाचे श्रेय गुजराती समाजाचे?
By admin | Published: May 10, 2014 01:37 AM2014-05-10T01:37:29+5:302014-05-10T01:37:29+5:30
मुंबईच्या विकासाचे श्रेय गुजराती समाजाचे असल्याचे सांगणार्या बेस्ट बसेसवरील जाहिरातींना मनसेने विरोध केला आहे.
मुंबई : पंतप्रधानपदासाठी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाठिंबा जाहीर केलेला असला तरी मुंबईच्या विकासाचे श्रेय गुजराती समाजाचे असल्याचे सांगणार्या बेस्ट बसेसवरील जाहिरातींना मनसेने विरोध केला आहे. मनसेने जाहिरातीचा हा मुद्दा उचलून धरल्याने आधीच गुजराती समाजाच्या मुद्द्यावरून अडचणीत असलेल्या शिवसेनेची पुरती गोची झाली आहे. ‘मुंबईनी आर्थिक प्रगतिमा, बौद्धिक विकासमा कोण? आपणो गुजराथी’ अशा आशयाची जाहिरात बेस्टच्या दोनशे बसगाड्यांवर काही दिवसांपासून झळकत आहे़ या गुजराती दैनिकाने बेस्ट बसवरील जाहिरातीतून मुंबईच्या विकासाचे श्रेय थेट गुजराती समाजाला दिले आहे़ ही जाहिरात म्हणजे मुंबईच्या जडणघडणीत मोलाचे योगदान असलेल्या सर्वच थोर व्यक्तींच्या कर्तृत्वालाच आव्हान असल्याचा संताप मनसे सदस्यांनी बेस्ट समितीच्या बैठकीत आज व्यक्त केला़ मुंबईतील गुजराती समाजाचा आवाज बुलंद करण्यासाठी हे वृत्तपत्र बांधील असल्याचे या जाहिरातीत म्हटले आहे़ यावर मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी बेस्ट समितीच्या बैठकीत हरकतीचा मुद्दा घेतला़ संयुक्त महाराष्ट्रासाठी १०५ हुतात्म्यांनी बलिदान दिले़ भागोजी कीर, नाना शंकरशेठ यांनी मुंबईसाठी स्वत:च्या जागा दिल्या़ त्यांचे योगदान नाही का, असा संताप मनसेच्या नगरसेवकांनी व्यक्त केला़ गुजराती समाजाबद्दल मुखपत्रातील अग्रलेखाच्या वादातून सुटका होत नाही तोच शिवसेनेसमोर ही नवीन अडचण उभी राहिली आहे़ (प्रतिनिधी)
अन्यथा मनसे स्टाईलने कारवाई मराठी माणसाचा अवमान करणारी ही जाहिरात बेस्टच्या बसेसवरून तात्काळ काढली नाही तर मनसे स्टाईलने कारवाई करण्यात येईल, असा सज्जड इशारा संदीप देशपांडे यांनी दिला़ याची गंभीर दखल घेत बेस्ट समितीचे अध्यक्ष अरुण दुधवडकर यांनी ही जाहिरात दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणारी असेल, तर काढली जाईल, असे आश्वासन दिले आहे.