गुजरातींनी मराठी शिकावे; राज्यपालांनी दिला सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2022 06:54 AM2022-08-03T06:54:01+5:302022-08-03T06:54:14+5:30
गुजराती सांस्कृतिक फोरम या मुंबईतील सामाजिक, सांस्कृतिक संस्थेच्या वतीने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ११ प्रसिद्ध गुजराती व्यक्तींना राज्यपालांच्या हस्ते राजभवन येथे सन्मानित करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गुजराती, राजस्थानी मुंबईत नसते तर इथे पैसाच दिसला नसता, या वादग्रस्त विधानानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आता महाराष्ट्रातील गुजराती लोकांना मराठी शिकण्याचा सल्ला दिला आहे. देशातील राष्ट्रीयतेचा भाव वृद्धिंगत करण्यासाठी प्रत्येकाने आपली सांस्कृतिक ओळख जपताना स्थानिक संस्कृतीशी एकरूप झाले पाहिजे, असेही राज्यपाल म्हणाले.
गुजराती सांस्कृतिक फोरम या मुंबईतील सामाजिक, सांस्कृतिक संस्थेच्या वतीने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ११ प्रसिद्ध गुजराती व्यक्तींना राज्यपालांच्या हस्ते राजभवन येथे सन्मानित करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
भारत हा सुंदर पुष्पगुच्छाप्रमाणे विविधतेने नटलेला देश आहे. प्रत्येक राज्याची वेशभूषा, भाषा इत्यादी बाबतीत स्वतंत्र ओळख असली तरीही सर्व भारतीयांना जोडणारे राष्ट्रीय चारित्र्य समान आहे. तसेच महाराष्ट्रात असताना मराठी भाषा शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असेही राज्यपाल कोश्यारी म्हणाले.
महाराष्ट्रात आल्यावर आपण स्वत: ५-६ महिन्यांत चांगली मराठी शिकलो. आपण राज्यातील प्रत्येक विद्यापीठामधील दीक्षान्त समारोहाचे संचालन तसेच चेंबर ऑफ कॉमर्स आदी व्यापारविषयक संस्थांमध्येदेखील संचालन मराठी भाषेतून किंवा शक्य नसल्यास हिंदीतून करावे असे आग्रहाने सांगत असतो.
- भगतसिंह कोश्यारी, राज्यपाल