गाढवांच्या बाजारातही गुजरातचा बोलबाला!
By Admin | Published: March 17, 2017 03:20 AM2017-03-17T03:20:02+5:302017-03-17T03:20:02+5:30
‘व्हायब्रंट गुजरात’चा नारा देऊन देशात बोलबाला निर्माण केलेला गुजरात पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र मढी येथे भरणाऱ्या सुप्रसिद्ध गाढवांच्या बाजारातही आघाडीवर आहे.
साहेबराव नरसाळे, अहमदनगर
‘व्हायब्रंट गुजरात’चा नारा देऊन देशात बोलबाला निर्माण केलेला गुजरात पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र मढी येथे भरणाऱ्या सुप्रसिद्ध गाढवांच्या बाजारातही आघाडीवर आहे. राज्यातील गावरान गाढवांबरोबरच उत्तर प्रदेश आणि गुजरातमधील गाढवं येथे मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आली आहेत. विशेष म्हणजे, गेल्या चार दिवसांत या गुजराती गाढवांनाच चांगली मागणी झाली आहे. त्यांच्या किंमती १५ टक्क्यांनी वाढल्या आहेत.
मानाची होळी पेटल्यानंतर मढी यात्रौत्सवास सुरुवात होते़ सुमारे १५ दिवस हा यात्रौत्सव चालतो़ उद्या शुक्रवारी पंचमीच्या दिवशी मुख्य यात्रौत्सव भरत आहे़ त्यानिमित्त मढी देवस्थानच्या पायथ्याला गाढवांचा बाजार भरला आहे़ हा बाजारही सुमारे आठवडाभर चालतो़ गाढवांच्या गावरान (महाराष्ट्रीयन) आणि काटोडिया (गुजरात) अशा दोन प्रमुख जाती आहेत़ कटोडिया जातीतीलच सुमारे ३०० गाढवं गुजरातमधून दाखल झाली आहेत़ गेल्या चार दिवसांत दीडशे गाढवांची हातोहात विक्री झाली आहे़ किमान पाच हजारापासून ते २५ हजारांपर्यंत किमती आहेत.
लहान गाढवाची किंमत ५ हजार रुपयांपासून सुरु होते. घारे डोळे असलेल्या गाढव मादीची सर्वाधिक २५ हजार रुपये किंमत काढण्यात आली आहे़ जंगली गाढवाची किंमत २० हजार रुपये असून जिराफासारखे दिसणारे हे गाढव बाजारातील एकमेव असून, ते दुर्मीळ असल्यामुळे त्याचा भाव जास्त असल्याचे विक्रेते म्हणाले.
‘सैराट’चा प्रभाव
बाजारात एका मालकाने आपल्या गाढव जोडीचे नाव परश्या व आर्ची असे ठेवले आहे़ आर्ची गाढवाचे डोळे घारे असून, परश्या जंगली प्रकारातील असल्याचे रमेश जाधव, संतोष माने यांनी सांगितले़