गुलाबाने फूलबाजार फुलला!
By admin | Published: February 14, 2017 03:38 AM2017-02-14T03:38:37+5:302017-02-14T03:38:37+5:30
‘व्हॅलेंटाइन डे’ला एकच दिवस उरल्याने गुलाबाला सोमवारी घाऊक बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी वाढली. त्यामुळे भावातही सुमारे १० टक्क्यांनी वाढ
पुणे : ‘व्हॅलेंटाइन डे’ला एकच दिवस उरल्याने गुलाबाला सोमवारी घाऊक बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी वाढली. त्यामुळे भावातही सुमारे १० टक्क्यांनी वाढ झाली. विशेषत: लाल गुलाबाला अधिक पसंती होती.
गुलटेकडी येथील मार्केटयार्डातील फूलबाजारात सोमवारी विविधरंगी गुलाबांची मोठी आवक झाली. मंगळवारी ‘व्हॅलेंटाइन डे’ असल्याने, किरकोळ फूलविक्रेत्यांकडून घाऊक बाजारात गुलाब खरेदीसाठी गर्दी करण्यात आली होती. त्यामुळे फूलबाजार फुलून गेला होता. जिल्ह्यातील मावळ, हवेली, मुळशी, तसेच भोर येथून मोठ्या प्रमाणात गुलाब बाजारात दाखल झाला. डच व साध्या गुलाबाची मिळून सुमारे २० हजार गड्ड्यांची आवक झाल्याची माहिती फुलांचे व्यापारी सागर भोसले यांनी दिली.
डच गुलाबाच्या एका गड्डीमध्ये २० तर साध्या गुलाबाच्या गड्डीत १० ते १२ फुलांचा समावेश असतो. या वर्षी डच गुलाबाची आवक तिपटीने तर साध्या गुलाबाची वीस ते तीस टक्क्यांनी वाढली आहे. डच गड्डीस ८० ते १८० रुपये तर साध्या गुलाबास २० ते ५० रुपये भाव मिळाला. ही फुले शहरासह दिल्ली, हैदराबाद, पश्चिम बंगाल आदी ठिकाणी जात असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे फूलबाजार विभागप्रमुख एन. डी. घुले यांनी दिली. (प्रतिनिधी)